होल्गर रुने, सिगमंड, रेओनिक, मारिया सॅकेरी यांना पहिल्याच फेरीत धक्का,
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
2023 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू झालेल्या शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या जोकोविचने तब्बल दोन वर्षानंतर आपले पुनरागमन विजयी सलामीने केले. कास्पर रुड, ग्रीसचा सित्सिपस यांनीही विजयी सलामी दिली. मात्र कॅनडाच्या रेओनिकचे आव्हान संपुष्टात आले. महिलांच्या विभागात अमेरिकेच्या कोको गॉफने, पोलंडच्या स्वायटेकने तसेच वोझनियाकीने आपल्या मोहिमेला दमदार प्रारंभ करताना पहिल्या फेरीत विजय नोंदवले. जर्मनीच्या सिगमंडचे तसेच रुमानियाच्या होल्गेर रुनेचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. रुनेचा पहिल्या फेरीतील पराभव हा स्पर्धेतील पहिल्या दिवसातील धक्कादायक निकाल ठरला.
अमेरिकेच्या जोकोविचने तब्बल दोन वर्षानंतर या स्पर्धेत आपले पुनरागमन करताना विजयी सलामी दिली. सोमवारी खेळवण्यात आलेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात त्याने अॅलेक्सांड्रे मुल्लेरचा 6-0, 6-2, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. या विजयामुळे जोकोविच पुन्हा एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत पुन्हा पहिल्या स्थानावर आरुढ होत आहे. जोकोविचने आतापर्यंत 23 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवली असून आता तो विक्रमी 24 वे जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.
2022 साली या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवणाऱ्या कास्पर रुडला विजयासाठी चार सेट्समध्ये झगडावे लागले. रुडने पहिल्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या इमिलो नेव्हावर 7-6 (7-5), 3-6, 6-4, 7-6(7-5) अशी मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. पाचव्या मानांकित रुडला नेव्हाने या सामन्यात कडवी लढत दिली. गेल्या वर्षी या स्पर्धेतील अंतिम लढतीत कास्पर रुडला स्पेनच्या टॉप सिडेड कार्लोस अॅलकॅरेझकडून पराभव पत्करावा लागला होता. अन्य एका सामन्यात झेंग झीझेनने वुल्फचा 7-5, 7-5, 6-7 (5-7), 4-6, 6-3 असा पराभव करत विजयी सलामी दिली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रुमानियाच्या होल्गर रुनेचा पराभव धक्कादायक निकाल ठरला. 63 व्या मानांकित रॉबर्टो कार्बालेस बायेनाने रुनेचा 6-3, 4-6, 6-3, 6-2 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. हा सामना पावणेतीन तास चालला होता. विम्बल्डन स्पर्धेत रुनेला स्पेनच्या कार्लोस अॅलकॅरेझकडून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 4 सेट्समध्ये हार पत्करावी लागली होती.
ग्रीसच्या स्टिफॅनोस सित्सिपसने विजयी सलामी देताना पहिल्या फेरीतील सामन्यात कॅनडाच्या मिलोस रेओनिकचे आव्हान 6-2, 6-3, 6-4 असे संपुष्टात आणले. गेल्या वर्षी या स्पर्धेत सित्सिपसला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती. ऑस्ट्रीयाच्या डॉम्निक थिएमने विजयी सलामी देताना बुबलिकचे आव्हान 6-3, 6-2, 6-4 असे संपुष्टात आणले. थिएमने 2020 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती.
महिलांच्या विभागात अमेरिकेच्या कोको गॉफने जर्मनीच्या लॉरा सिगमंडवर 3-6, 6-2, 6-4 अशी मात करत विजयी सलामी दिली. दुसऱ्या एका सामन्यात माजी टॉप सिडेड कॅरोलिनी वोझनियाकीने विजयी सलामी देताना तातियाना प्रोझोरोव्हाचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. निवृत्तीच्या निर्णयानंतर पुन्हा टेनिस क्षेत्रात पुनरागमन करताना वोझनियाकीची ही तिसरी स्पर्धा आहे. पोलंडच्या टॉप सिडेड स्वायटेकने केवळ 58 मिनिटात रिबेका पिटरसनचा 6-0, 6-1 असा फडशा पाडत विजयी सलामी दिली. अन्य एका सामन्यात रिबेका मॅसारोव्हाने इटलीच्या मारिया सॅकेरीचे आव्हान 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या पेराने व्हेरोनिका कुडेरमेटोव्हावर 7-5, 6-4 अशी मात करत दुसरी फेरी गाठली.
अंकिता पुन्हा प्रमुख ड्रॉपासून वंचित
या स्पर्धेत महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळवण्यासाठी सहभागी झालेल्या भारताच्या अंकिता रैनाला पुन्हा यावेळी प्रमुख ड्रॉपासून वंचित व्हावे लागले. प्रमुख स्पर्धा सुरू होण्यापूर्वी घेतल्या गेलेल्या पात्र फेरीच्या अंतिम सामन्यात अंकिताला मिरजेम बिजॉर्कलुंडकडून 2-6, 2-6 असा पराभव पत्करावा लागला. हा अंतिम सामना 100 मिनिटे चालला होता. प्रमुख टेनिस स्पर्धेमध्ये पात्र फेरीच्या अंतिम सामन्यापर्यंत रैनाने दुसऱ्यांदा मजल मारली होती.