वृत्तसंस्था/ ढाका
20 वर्षाखालील वयोगटाच्या शुक्रवारी येथे सुरू झालेल्या सॅफ महिलांच्या फुटबॉल स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाने दणकेबाज विजयी सलामी देताना भूतानचा 12-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारतीय संघातील तीन खेळाडूंनी हॅट्ट्रीक नोंदवली.
या स्पर्धेतील हा सलामीचा सामना एकतर्फीच झाला. भारतीय महिला फुटबॉलपटूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक आणि वेगवान खेळावर भर देत भूतानवर दडपण आणण्यात यश मिळवले. भारतीय संघातील नेहाने 47 व्या, 55 व्या आणि 90 व्या मिनिटाला असे तीन गोल केले. अनिताकुमारीने 50 व्या, 69 व्या आणि 78 व्या मिनिटाला गोल नोंदवले. लिंडा कॉमने 61 व्या, 63 व्या आणि 75 व्या मिनिटाला असे तीन गोल मारले. भारतातर्फे अपूर्णा नारझेरीने 29 व्या आणि 36 व्या मिनिटाला असे दोन गोल तर नितू लिंडाने 43 व्या मिनिटाला एक गोल नोंदवला. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांच्या कालावधीत भारताला आपले खाते उघडता आले नव्हते पण त्यानंतर भारताने भूतानवर गोलांचा वर्षाव सुरू केला. या सामन्यात भूतानला शेवटपर्यंत आपले गोल नोंदवता आले नाही. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने 4-0 अशी आघाडी भूतानवर मिळवली होती. सामन्याच्या उत्तरार्धात भारताने 8 गोल नोंदवून विजयावर शिक्कामोर्तब केला. सदर स्पर्धा राऊंड रॉबिन लिग पद्धतीने खेळवली जात असून भारताचा पुढील सामना यजमान बांगलादेश बरोबर रविवारी खेळवला जाणार आहे.