वृत्तसंस्था/ इंफाळ
लोकसभा निवडणुकीपूर्वीही मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. शनिवारी सायंकाळी आणखी एका गोळीबाराच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. पूर्व इंफाळ आणि कांगपोकपी जिह्यांदरम्यान शेजारच्या मोइरंगपुरेल भागात दोन सशस्त्र गटांमध्ये गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले. मृत झालेले दोघेही कुकी समाजाचे आहेत. दोन दिवसांत गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. वाढत्या तणावामुळे संपूर्ण परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. मोइरंगपुरेल भागातील कुकी आणि मैतेईमध्ये चकमक झाल्यानंतर गोळ्या झाडण्यात आल्या. सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे. गोळीबारात कुकी समाजातील दोन लोकांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आदिवासी एकता समितीने कांगपोकपी जिह्यात 13 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण 24 तासांचा बंद पुकारला आहे.