वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फोक्सवॅगन कंपनी आगामी काळामध्ये 2500 इलेक्ट्रिक मोटारी आयात करणार असून त्यांची विक्री भारतात करणार आहे. सदरची कंपनी भारतातच स्थानिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार असली तरी आयातीत इलेक्ट्रिक कार 2023 मध्ये भारतीय बाजारात उतरवली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
फोक्सवॅगन एजीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार आयडी-4 पुढील वर्षी भारतामध्ये विक्री करण्याची योजना बनविली आहे. काही दक्षिण आशियाई देशांमध्येही सदरची गाडी विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पुढील वर्षापर्यंत ठराविक इलेक्ट्रिक मोटारींची आयात केली जाणार असल्याचे फोक्सवॅगन पॅसेंजर कार विभागाचे भारतातील संचालक आशिष गुप्ता यांनी सांगितले आहे.
2025 मध्ये भारतातच निर्मिती
ऑटो निर्मात्या कंपन्यांना विदेशातून 2500 इतक्या इलेक्ट्रिक कार्स आयात करण्याची अट घालण्यात आली आहे. या आधारावर पाहता फोक्सवॅगन भारतातच स्थानिक स्तरावर इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती करण्यावर भर देणार आहे. 2025 ते 2027 पर्यंत सदरच्या कार्स भारतीय रस्त्यांवर दौडताना दिसतील, असेही गुप्ता यांनी म्हटले आहे.