२१ ऑक्टोबर रोजी अंतिम यादी होणार तयार
प्रतिनिधी/गडहिंग्लज
गडहिंग्लज तालुक्यातील डिसेंबरअखेर मुदत संपणाऱया 34 ग्रामपंचायतीच्या प्रारूप मतदार यादी आज गुरूवार दि. 13 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. 31 मे 2022 अखेर नोंदणीकृत मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. मतदार यादी प्रसिद्ध आणि अंतिम झाल्यानंतर ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असल्याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर खेडोपाडी निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार हे मात्र नक्की.
गडहिंग्लज तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरला संपणार आहे. मुदत संपण्यापूर्वीच नव्या सदस्यांची निवडणूक होणे गरजेचे असल्याने निवडणूक विभागाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार गडहिंग्लज निवडणूक विभागाकडून आज 34 ग्रामपंचायतीच्या ठिकाणी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका, ओबीसी आरक्षणामुळे काही ग्रामपचांयतीवर प्रशासकांच्या नेमणुका झाल्या आहेत. त्याप्रमाणे 34 ग्रामपंचायतीवर प्रशासकांच्या नेमणुकीसाठी जिल्हा परिषदेकडून गडहिंग्लज पंचायत समितीला पत्र मिळाले असून नावे देण्याची सूचना देण्यात आली आहे.
आज प्रसिद्ध होणाऱया प्रारूप मतदारयादीनंतर हरकती, सूचना 18 ऑक्टोबरपर्यत घेतली जाणार आहे. त्यानंतर शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांची घायमेल उडाली असून आपल्या प्रभागातील मतदारावर डोळा लागला आहे.
या गावातील प्रभागनिहाय मतदार यादी होणार प्रसिद्ध
महागाव, तावरेवाडी, हिटणी, हरळी खुर्द, येणेचवंडी, सरोळी, काळामावाडी, वैरागवाडी, डोणेवाडी, हिडदुगी, बिद्रेवाडी, कडाल, कळविकट्टी, जखेवाडी, कुंबळहाळ, तारेवाडी, यमेहट्टी, बटकणंगले, कौलगे, कुमरी, बेकनाळ, भडगाव, कडगाव, करंबळी, मुगळी, खमलेहट्टी, शिफ्पूर तर्फ नेसरी, नेसरी, हसुरसासगिरी, सांबरे, कडलगे, बडय़ाचीवाडी, हसुरवाडीचा समावेश आहे.