कामगार बसपासच्या प्रतीक्षेत : वेबसाईट सुरळीत करा : 28 रोजी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देणार
प्रतिनिधी / बेळगाव
बांधकाम कामगार आणि इतर कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली मोफत बसपासची वेबसाईट बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना मोफत बसपासपासून वंचित रहावे लागले आहे. जिल्हय़ातील केवळ 11 हजार कामगारांनाच बसपास वितरित करण्यात आले आहेत. शिवाय राज्यात 1 लाख बसपास वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करत वेबसाईट बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
बांधकाम क्षेत्रातील कामगारांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाकडून कामगारांना मोफत बसपास वितरित केले जात आहेत. मात्र शासनाने राज्यात 1 लाख कामगारांना बसपास वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. शिवाय उर्वरित कामगारांना दुसऱया टप्प्यात बसपास वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे सध्या मोफत बसपासची वेबसाईट बंद करण्यात आली आहे, असे कामगार आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मात्र जिल्हय़ातील सर्व कामगारांना त्वरित बसपास मिळावेत, यासाठी कामगार संघटना प्रयत्नशील आहे. जिल्हय़ात 2 लाख 6 हजार 96 इतकी बांधकाम क्षेत्रातील कामगारांची संख्या आहे. त्यामध्ये आतापर्यंत केवळ 11 हजार कामगारांना बसपास मिळाले आहेत. त्यामुळे उर्वरित कामगार बसपासच्या प्रतीक्षेत आहेत. तांत्रिक अडचणी दूर करून बसपास वितरणाची वेबसाईट सुरळीत सुरू करावी, यासाठी दि. 28 ऑक्टोबर रोजी कामगार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले जाणार आहे.
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱया कामगारांना कामासाठी विविध ठिकाणी फिरावे लागते. यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाकडून मोफत बसपास वितरण योजना राबविली आहे. कामगारांच्या राहत्या घरापासून 45 किलो मीटर अंतरापर्यंत या बसपासच्या माध्यमातून प्रवास करता येणार आहे. मात्र वेबसाईट बंद झाल्याने मोफत बसपासची योजना थांबली आहे. त्यामुळे लाखो कामगारांना बसपाससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.