28 कोटींचे ब्रेसलेटही जप्त : एका आरोपीला अटक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली विमानतळावर 7 अत्यंत महागडय़ा घडय़ाळांची तस्करी करणाऱया एका व्यक्तीला कस्टम विभागाच्या अधिकाऱयांनी गुरुवारी अटक केली आहे. या व्यक्तीकडून जप्त करण्यात आलेल्या घडय़ाळांपैकी एक सोन्याचे असून त्यावर हिरे जडविलेले आहेत. या एका घडय़ाळाची किंमतच 27.09 कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे.
किमतीच्या दुष्टीकोनातून ही वाणिज्यिक किंवा आलिशान सामग्रींची सर्वात मोठी जप्ती असल्याचे सीमा शुल्क आयुक्त जुबेर रियाज कामीली यांनी सांगितले आहे. दुबईतून नवी दिल्लीत पोहोचलेल्या आरोपीला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱयांनी रोखले होते. त्याच्या सामानाची विस्तृत तपासणी तसेच वैयक्तिक झडतीदरम्यान 7 मनगटी घडय़ाळे हस्तगत झाल्याचे सांगण्यात आले.
जॅकब अँड कंपनी (मॉडेल ः बीएल115.30ए), पियोज लाइमलाइट स्टॅला (एसआय. नं.1250352 पी11179), रोलेक्स ओयस्टर पर्पेप्चुअल डेट जस्ट (एसआय.नं. झेड7जे12418), रोलेक्स ओयस्टर पर्पेच्युअल डेट जस्ट (एसआय.नं. 237 क्यू5385) आणि रोलेक्स ओयस्टर पर्पेच्युअल डेट जस्ट (एसआय.नं.861आर9269) या मॉडेलच्या घडय़ाळांचा यात समावेश आहे. जॅकब अँड कंपनीच्या एका घडय़ाळाची किंमत 27 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले.
या घडय़ाळांच्या व्यतिरिक्त आरोपीकडून 28.17 कोटी रुपयांचे हिरेजडित सोन्याचे ब्रेसलेट आणि एक आयफोन14 प्रो हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी आणि त्याच्या नातलगाचे दुबईत महागडय़ा घडय़ाळांचे एक शोरुम असल्याचे अधिकाऱयाने सांगितले आहे.