पुलाची शिरोली/वार्ताहर
पंचगंगा नदीच्या महापुराच्या पाण्याची पातळी अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हालोंडी व शिये ग्रामस्थांनी पहिल्या टप्प्यात जनावरे स्थलांतर करावीत. असे आवाहन शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी मंगळवारी दुपारी केले. हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांनी हालोंडी, पुलाची शिरोली व नागाव या गावांना भेटी देवून सरपंच, उपसरपंच, शासकीय अधिकारीव कर्मचारी यांचेशी संवाद साधून पुरस्थितीचा आढावा घेवून सुचना दिल्या. तसेच निवारा ठिकाणे असलेल्या शाळेच्या इमारती व मंगल कार्यालये यांचीही पहाणी करण्यात आली.
सपोनि गिरी यांनी स्वतःहालोंडी व शिये गावात जावून पुराच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने सुरक्षितेच्या द्रुष्टीने लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना पहिल्या टप्प्यात जनावरे स्थलांतर करणेबाबत सुचना दिल्या. त्यानंतर कौटुंबिक नुकसान टाळण्यासाठी सर्वानी सावध रहाण्याचे आवाहन केले.
पंचगंगा नदीच्या महापुराचे पाणी रस्त्यावर वाढल्याने कोल्हापूरकडून शिरोली औद्योगिक वसाहतीकडे जाणारा सेवा मार्ग मंगळवारी दुपार पासुन वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.
पुणे बंगलूर राष्ट्रीय महामार्गालगत पश्चिम दिसेला बुधले मंगल कार्यालयासमोर सेवामार्ग आहे. कोल्हापूरकडून सांगलीफाटा (शिरोली) कडे लहान मोठी वाहने येण्यासाठी या सेवामार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू असतो. पण पंचगंगा नदीला महापुराचे पाणी वाढल्याने बुधले मंगल कार्यालगतच्या सेवामार्गावर पाणी आले. त्यामुळे शिरोली एमआयडीसी पोलिसांनी बँरीकेट्स लावून हा सेवामार्ग बंद केला आहे.
तसेच शिरोली औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या हनुमान नगर येथून शिये गावात जोडला जाणारा सेवामार्गावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शिये गावात ये- जा करण्यासाठी शिये फाटा येथील मुख्य रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन शिरोली पोलिसांनी केले आहे.
तसेच हनुमान नगर (शिये) ते कसबा बावडा दरम्यानच्या रस्त्यावर काळा ओढा येथे पंचगंगा नदीच्या पुराचे पाणीवाढू लागल्यामुळे हाही रस्ता मंगळवारी रात्री पर्यंत वाहतूकीस बंद करावा लागण्याची शक्यता शिरोली पोलीस ठाणे अंमलदार निलेश कांबळे यांनी सांगितले.