प्रतिनिधी/बेळगाव:बेळगाव उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्याने, ते पक्षांतर करण्याची बातमी हल्ली चर्चेत होती मात्र ही फक्त अफवाच असल्याचे माजी आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
आज बेळगाव शहरात बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपलाल्या दोन वेळा तिकीट नाकारले होते. तिसऱ्या खेपेस तिकीट मिळाले आणि आपण आमदार झालो. त्यानंतर यंदा आपल्याला तिकीट देण्यात आले नाही. त्यामुळे आपण खचून न जाता पक्षाच्या तत्वांविरोधात काम केलेले नाही आणि करणार ही नाही. यापूर्वी आपण भाजपचा कार्यकर्ता होतो आणि भविष्यात ही राहणार. आपण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसच्या संपर्कात नाही आणि भविष्यातही राहणार नाही. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्याशी आपली भेट ६ महिन्यापूर्वी झाली होती. यासंदर्भात प्रसारमाध्यमा द्वारे चर्चेत असलेली बातमी साफ खोटी आहे. आपण काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याच्या संपर्कात नाही. आगामी काळातही भाजपासाठीच सक्रिय असणार असून जनतेने अफवावर विश्वास ठेवू नये असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात माजी आमदार अनिल बेनके म्हणाले कि , जर पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्याला संधी दिली तर आपण नक्की निवडणूक लढवू असे सांगत, आपण देखील लोकसभा निवडणुकीकरीता इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. जर आपल्याला तिकीट न मिळाल्यास पक्ष जो उमेदवार ठरवेल त्यांना आपला पाठींबा असल्याचे सांगितले.