बॅरिकेड्समुळे रात्रीच्यावेळी होताहेत अपघात
प्रतिनिधी /बेळगाव
गोगटे सर्कलच्या पुढे नानावाडीकडून येणाऱया नाल्यावर काँग्रेस रोडवर काही दिवसांपूर्वी खोदाई करण्यात आली होती. परंतु अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने बॅरिकेड्स लावून ठेवण्यात आले आहेत. रात्रीच्यावेळी रेल्वे स्टेशनकडून भरधाव येणारी वाहने या बॅरिकेडवर येऊन आदळत आहेत. मागील महिन्याभरात दोन ते तीनवेळा अपघातामुळे हे बॅरिकेड्स कोसळले होते. त्यामुळे हे काम केव्हा पूर्ण होणार, अशी विचारणा वाहनचालकांमधून केली जात आहे.
गोगटे सर्कल ते पहिले रेल्वेगेट रस्त्याचे काँक्रिटीकरण दीड वर्षांपूर्वी करण्यात आले होते. परंतु मिलिटरी महादेव मंदिरासमोर नाल्यानजीक दुरुस्तीसाठी रस्ता खणण्यात आला होता. मागील महिनाभरापासून येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु अद्याप काम पूर्ण न झाल्याने येथे बॅरिकेड्स लावून ठेवण्यात आले आहेत.
मुख्य रस्त्यावर बॅरिकेड्स असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी बॅरिकेड्स दृष्टीस न पडल्यामुळे अपघात होत आहेत.