टेम्बा बहुमा सामनावीर, अॅल्डेन माक्रेम मालिकावीर
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
यजमान दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विंडीजचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. शनिवारी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने खेळाच्या चौथ्या दिवशी विंडीजचा 285 धावांनी दणदणीत पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बहुमाला ‘सामनावीर’ तर मार्व्रेमला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 320 धावा केल्यानंतर विंडीजचा पहिला डाव 251 धावा आटोपला. द. आफ्रिकेने पहिल्या डावात 69 धावांची आघाडी मिळवली. द. आफ्रिकेने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली. कर्णधार बहुमाने शानदार खेळी करताना 280 चेंडूत 20 चौकारासह 172 धावा झळकवल्या. मुल्डेरने 8 चौकारासह 42 धावा जमवल्या. विंडीजतर्फे होल्डर आणि मेयर्स यांनी प्रत्येकी 3 तर जोसेफने 2 आणि रॉचने एक गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेने 7 बाद 287 या धावासंख्येवरून चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे उर्वरित तीन गडी 34 धावांची भर घालत तंबूत परतले. द. आफ्रिकेकडून विंडीजला निर्णायक विजयासाठी 391 धावांचे कठीण आव्हान मिळाले.
द. आफ्रिकेच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर विंडीजचा दुसरा डाव चहापानापूर्वीच 35.1 षटकात 106 धावात आटोपला. डिसिल्वाने 1 षटकार आणि 5 चौकारासह 34, कर्णधार ब्रेथवेटने 3 चौकारासह 18, होल्डरने 4 चौकारासह 19 तर जोसेफने 2 षटकार आणि 1 चौकारासह 18 धावा जमवल्या. द. आफ्रिकेतर्फे हार्मेरने तसेच कोझीने प्रत्येकी 3 तर रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका प. डाव 320, विंडीज प. डाव 251, द. आफ्रिका दु. डाव सर्वबाद 321 (बहुमा 172, मुल्डेर 42, होल्डर आणि मेयर्स प्रत्येकी तीन बळी, जोसेफ 2 बळी, रॉच व रिफेर प्रत्येकी एक बळी), विंडीज दु. डाव 35.1 षटकात सर्वबाद 106 (डिसिल्वा 34, होल्डर 19, ब्रेथवेट 18, जोसेफ 18, हार्मेर 3-45, कोझी 3-37, केशव महाराज 2-4, रबाडा 2-19).