आरबीआय करतेय मोठय़ा बदलावर विचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) पहिल्यांदाच बँक नोटेवर छायाचित्र परिवर्तन करण्याचा विचार करत आहे. भारतीय चलनावर महात्मा गांधी यांच्यासह रविंद्रनाथ टागोर तसेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे छायाचित्र वापरण्याचा विचापर केला जात आहे. आतापर्यंत नोटेवर केवळ महात्मा गांधी यांचे छायाचित्र दिसून आले आहे, परंतु लवकरच यात बदल होऊ शकतो.
आरबीआय काही नोटांच्या सीरिजवर टागोर आणि कलाम यांच्या छायाचित्राचा वापर करण्याचा विचार करत आहे. अर्थ मंत्रालय आणि आरबीआय लवकरच यासंबंधी पाऊल उचलू शकते. बँक नोटावर महात्मा गांधी यांच्याव्यतिरिक्त अन्य प्रसिद्ध व्यक्तींच्या छायाचित्रांचा वापर करण्यासंबंधी आरबीआय पहिल्यांदाच विचार करत आहे.
अर्थ मंत्रालय आणि आरबीआय अंतर्गत येणाऱया सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून गांधी, टागोर आणि कलाम यांच्या वॉटरमार्कयुक्त छायाचित्रांच्या नमुन्यांचे दोन वेगवेगळे सेट आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक दिलीप शाहनी यांना पाठविण्यात आले आहेत. दोन सेट्सपैकी एक सेट निवडून सरकारसमोर सादर करण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय उच्चस्तरीय बैठकीत घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चलनी नोटांवर अनेक अंकांच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. अमेरिकेत विविध मूल्याच्या डॉलर्समध्ये जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामीन प्रँकलिन, थॉमस जेफरसन, ऍन्ड्रय़ू जॅक्सन, अलेक्झेंडर हॅमिल्टन आणि अब्राहम लिंक यांच्यासह 19 व्या शतकातील काही राष्ट्रपतींची छायाचित्रे आहेत.