येत्या पंधरा दिवसात प्रश्न न सुटल्यास आंदोलन छेडू – संजय पांगम
सावंतवाडी तालुक्यातील दांडेली खोतवाडी -धनगरवाडी येथे, पाणीटंचाई लक्षात घेता राष्ट्रीय पेयजल योजनेतून मार्च 2020 मध्ये नळ पाणी योजना मंजूर झाली होती. व सदर योजनेचे कामही सुरू करण्यात आले होते.मात्र तीन वर्षाहून अधिक काळ होऊनही ठेकेदार व पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सदर योजना अद्याप पर्यंत कार्यान्वित होऊ शकलेली नाही. ग्रामपंचायत प्रशासनाला विचारणा केली असता सदर योजना ग्रामपंचायतकडे हस्तांतरण झाली नसल्याचे ते सांगतात. त्यामुळे ग्रामस्थांची अवस्था हि “बाप भीक मागू देईना व आई जेवू घालीना “अशी झाली आहे.
या संदर्भात दांडेली माझी ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना शाखाप्रमुख श्री तानाजी खोत तसेच माजी सरपंच श्री संजय पांगम यांनी जिल्हा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री महाजनी साहेब यांची भेट घेतली त्यांनी सदर योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आपण संबंधित ठेकेदार तसेच अधिकारी यांना देतो अशी ग्वाही दिली. पुढे गणेश चतुर्थी सारखा मोठा सण येत असल्याने येत्या पंधरा दिवसात सदर योजना पूर्णपणे कार्यान्वित न झाल्यास दोन्ही वाड्यातील ग्रामस्थांना घेऊन शिवसेना शाखा दांडेलीच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा श्री खोत व श्री पांगम यांनी दिला आहे.