वृत्तसंस्था/ कराची
सध्या विंडीजचा महिला क्रिकेट संघ पाकच्या दौऱ्यामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहेत. या मालिकेत येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात विंडीजने पाकचा 7 गड्यांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. या दुसऱ्या सामन्यात विंडीजच्या हिली मॅथ्यूजला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 121 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 18.2 षटकात 3 बाद 124 धावा जमवित हा सामना 10 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी आरामात जिंकला. या विजयामुळे विंडीजने मालिकेतील आपली आघाडी अधिक भक्कम केली असून त्यांचा हा सलग दुसरा विजय आहे.
पाकच्या डावामध्ये मुनीबा अलीने 47 चेंडूत 5 चौकारांसह 55, फिरोजाने 2 चौकारांसह 14, आमिनने 2 चौकारांसह 10 आणि कर्णधार निदा दारने 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. पाकच्या डावामध्ये 11 चौकार नोंदविले गेले. विंडीजतेर्फे मॅथ्यूजने 25 धावांत 3 तर हेन्री, फ्लेचर आणि करिश्मा रामहार्क यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात कर्णधार हिली मॅथ्यूजने 43 चेंडूत 10 चौकारांसह 58, कँपबेलने 29 चेंडूत 1 चौकारासह 21, नेशनने 1 चौकारासह नाबाद 17 तर हेन्रीने नाबाद 8 धावा जमविल्या. मॅथ्यू आणि कँपबेल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 67 धावांची भागिदारी केली. विंडीजच्या डावात 12 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे सादिया इक्बाल, डायना बेथ आणि तुबा हसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – पाक 20 षटकात 7 बाद 121 (मुनिबा अली 55, फिरोजा 14, निजादार 13, अमिन 10, अवांतर 9, मॅथ्यूज 3-25, हेन्री, फ्लेचर, रामहार्क प्रत्येकी 1 बळी), विंडीज 18.2 षटकात 3 बाद 124 (जोसेफ 7, हिली मॅथ्यूज 58, कँपबेल 21, नेशन नाबाद 17, हेन्री नाबाद 8, अवांतर 13, सादिया इक्बाल, डायना बेग, तुबा हसन प्रत्येकी 1 बळी).