प्रतिनिधी /तिसवाडी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सांत आंदे परिसरात पाच प्रकल्पांची पायाभरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते करण्यात आली होती. यापैकी आगशी स्मशानभूमी पार्किंग प्रकल्पाच्या कामाला आता सुरुवात झाली आहे.
दरम्यान माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी या कामाची पाहणी करून हा प्रकल्प नियोजित काळात पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सेंट लॉरेन्स ग्रामपंचायतीचे सरपंच झेव्हियर ग्रासियस व संबंधित खात्याचे सरकारी अधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या पाच मोठय़ा विकासकामांचा यात समावेश आहे. यावेळी सेंट लॉरेन्स पंचायतीचे सरपंच झेव्हियर ग्रासीयस, आगशी काँफ्रारिआ समितीचे अध्यक्ष व्हिक्टर ग्रासीयस, ऍटर्नी सुकोरीन गोन्साल्वीस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. स्मशानभूमीच्या पार्किंग जागेच्या प्रकल्पासाठी 50 लाख रु. मंजूर झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीवेळी आचारसंहितेमुळे विकासकामे प्रलंबित राहिली होती. आता ही कामे हाती घेण्यात येणार असल्याचे सरपंच ग्रासीयस यांनी सांगितले.