आंबिल गाड्यांची रात्री उशिरापर्यंत मिरवणूक : आज इंगळ्यांचा कार्यक्रम
वार्ताहर /येळ्ळूर
येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. सायंकाळी आंबिल गाड्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक झाली. गाड्यांना सुशोभित करण्यात आले होते. याचबरोबर बैलजोड्यांनाही सजवून मिरवणुकीत सामील करण्यात आले होते. गुलालाची उधळण करत या आंबिल गाड्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात या यात्रेला सुरुवात झाली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत आंबिल गाड्यांची मिरवणूक पार पडली. मंगळवारी सकाळी बैलजोड्यांना सजवून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 च्या सुमारास ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवी मंदिरासमोर तसेच कलमेश्वर मंदिरासमोर इंगळ्यांचा कार्यक्रम होणार आहे. या यात्रोत्सवासाठी नातेवाईक तसेच मित्र मंडळी मोठ्या प्रमाणात येळ्ळूरकडे येत आहेत. बुधवारी श्री लक्ष्मीदेवीचा वाढदिवस व त्यानंतर देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र मैदान येळ्ळूर येथे कुस्त्यांचे उद्घाटन होणार आहे. गुरुवारी देशातील नामांकित मल्लांच्या कुस्त्या होणार आहेत. त्यासाठी कुस्ती आखाडा आयोजकांनी जोरदार तयारी केली असून यावर्षीही मोठ्या प्रमाणात कुस्त्या पार पडणार आहेत. यावेळी 1 लाखाहून अधिक कुस्तीशौकीन उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आयोजकांनी 15 दिवसांपासूनच याची तयारी सुरू केली आहे.