विशेष मुलांसाठी दोन दिवसीय योग शिबीर
प्रतिनिधी /पणजी
सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन क्षेत्रीय कार्यालय गोवा आणि पणजी सम्राट क्लब यांच्या सहकार्याने, पर्वरी येथील संजय स्कूलमधील दिव्यांग मुलांसाठी दोन दिवसीय योग शिबीर सुरु केले. तसेच संजय स्कूलचे मुख्याध्यापक तातो कुडाळकर यांच्याकडे पन्नास योग मॅट्स देण्यात आले.
योगाभ्यास नियमित केल्यास मिळणाऱया शारीरिक आणि मानसिक लाभांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पत्र सूचना कार्यालय, गोवाचे सहसंचालक विनोद कुमार,सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी रियास बाबू, सम्राट क्लबचे अध्यक्ष दीपक नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आपल्या जीवनात योगाला अध्यात्मीक महत्त्व आहे. दैनंदिन जीवनात संतुलित वृत्ती राखण्याचे उपाय येगामुळे सुचतात. योग एखाद्याला कामगिरीत कौशल्य प्राप्त करून देते, असे गोवा पत्र सूचना कार्यालयाचे सहसंचालक विनोद कुमार यांनी सांगितले.
माणसाचे मन, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी योगाभ्यास उपयुक्त आहे, 21 जून रोजी होणाऱया आंतरराष्ट्रीय योग दिनात 180 हून अधिक देश सहभागी होत असून गोव्यातून 33 क्लब सहभागी होत आहेत, असे पणजी सम्राट क्लबचे प्रदेशाध्यक्ष दीपक नार्वेकर यांनी सांगितले.
योगाचार्य सुरेश कुमार यांनी संजय स्कूलच्या विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके दाखविली. शिबीरात 75 विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला.
क्लबच्या अध्यक्ष प्रेरणा पावसकर यांनी स्वागत केले. प्रकाश महांबरे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक तातो कुडाळकर यांनी आभार मानले.