महिला पोलीस स्थानकाची कारवाई : शहर परिसरात खळबळ
बेळगाव : पहिल्या पत्नीला धोका देऊन दुसऱ्या पत्नीशी विवाह करणाऱ्या वराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरामध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. महम्मद असीफ इनामदार, रा. हनुमाननगर असे त्याचे नाव आहे. महम्मद हा पत्नी तबस्सुम इनामदार हिला मारबडव करत होता. हुंड्यासाठी तगादाही लावत होता. मात्र, तिने हुंडा देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने धमकी दिली होती. महम्मद याने एका महिलेशी विवाह केल्याची माहिती पहिली पत्नी तबस्सुम यांना मिळाली. त्यांनी तातडीने महिला पोलीस स्थानकामध्ये धाव घेतली आणि महम्मद इनामदार याच्याविरोधात तक्रार दाखल केली.पोलिसांनी महम्मद इनामदार याच्याविरोधात भादंवि 498 अ, 323, 504, 506, 417, 418, 447, सहकलम 34 अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर महम्मद हा शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. तेथून त्याला ताब्यात घेतले आहे. पहिली पत्नी असताना दुसरे लग्न केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सध्या लग्न केलेली महिला ही सामाजिक कार्यकर्ती म्हणून काम करीत होती. मी अनेकांची घरे जोडली आहेत, असे सांगून ती कार्यरत होती. मात्र, आता स्वत:च तिने घर जोडल्याने सर्व ‘सीमा’ ओलांडल्याचे बोलले जात आहे.