वनडे मालिकेत झिम्बाब्वेची बरोबरी, वेस्ले मध्वेरे ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ हरारे
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान झिम्बाब्वेने गुरुवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱया सामन्यात आयर्लंडवर केवळ एका धावेने थरारक विजय मिळवून 1-1 अशी बरोबर साधली आहे. झिम्बाब्वेच्या वेस्ले मध्वेरेला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. झिम्बाब्वेचा डाव 49.2 षटकात 271 धावात आटोपला. त्यानंतर आयर्लंडने 50 षटकात 270 धावा जमविल्याने त्यांना हा सामना केवळ एका धावेने गमवावा लागला. या मालिकेतील पहिला सामना आयर्लंडने जिंकून आघाडी घेतली होती. झिम्बाब्वेने दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली असून आता तिसरा सामना निर्णायक राहील.
झिम्बाब्वेच्या डावामध्ये सीन विलियम्सने 73 चेंडूत 11 चौकारांसह 77, कर्णधार एर्विनने 42 चेंडूत 5 चौकारांसह 39, वेस्ले मध्वेरेने 50 चेंडूत 6 चौकारांसह 43, बॅलेन्सीने 3 चौकारांसह 14, क्लाईव्ह मॅडेंडेने 57 चेंडूत 5 चौकारांसह 52, मासाकेझाने 1 चौकारासह 10 तर मुझारबनीने 16 चेंडूत 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. कर्णधार एर्विन आणि मध्वेरे यांनी सलामीच्या गडय़ासाठी 11 षटकात 61 धावांची भागीदारी केली. एर्विन बाद झाल्यानंतर त्यांचे 3 गडी लवकर बाद झाले. मिकेरेनने बॅलेन्सीला पायचीत केले. त्यानंतर शरीझ अहमदने मध्वेरेला झेलबाद केले. सिकंदर रझा खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतला. बुरीने 8 धावा जमविल्या. झिम्बाब्वेची यावेळी स्थिती 24.5 षटकात 5 बाद 120 अशी होती. सीन विलियम्स आणि मॅडेंडे यांनी सहाव्या गडय़ासाठी 104 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. झिम्बाब्वेच्या डावात 35 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे शरीझ अहमद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 43 धावात 5 तर मिकेरेन आणि ऍकरमन यांनी प्रत्येकी 2 तर क्लेनने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडच्या डावामध्ये मॅक्स ओ दाऊद आणि कूपर यांनी शानदार अर्धशतके झळकविताना दुसऱया गडय़ासाठी 125 धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी सलामीचा विक्रमजित सिंग 1 षटकार आणि 1 चौकारासह 14 धावांवर बाद झाला. ऍकरमनने 36 चेंडूत 2 चौकारांसह 28 धावा झळकविल्या. मॅक्स ओ दाऊदने 103 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 81 तर कूपरने 84 चेंडूत 9 चौकारांसह 74 धावा झळकविल्या. कर्णधार एडवर्ड्सने 28 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 36 धावा जमविल्या. एडवर्ड्स आठव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. झिम्बाब्वेच्या क्षेत्ररक्षकांनी चपळ क्षेत्ररक्षण करत शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर क्लेनला 8 धावांवर धावचीत केल्याने झिम्बाब्वेला हा सामना केवळ एका धावेने जिंकता आला. आयर्लंडच्या डावात 5 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. झिम्बाब्वेतर्फे सिकंदर रझाने 39 धावात 3, वेस्ले मध्वेरेने 36 धावात 3, मुझारबनीने 39 धावात 1 गडी बाद केला. आयर्लंडचे 3 गडी धावचीत झाले. आयर्लंडच्या मॅक्स ओ दाऊद आणि कूपर यांची अर्धशतके वाया गेली.
संक्षिप्त धावफलक
झिम्बाब्वे 49.2 षटकात सर्वबाद 271 (एर्विन 39, वेस्ले मध्वेरे 43, बॅलेन्सी 14, विलियम्स 77, मॅडेंडे 52, मासाकेझा 10, मुझारबनी नाबाद 17, अवांतर 7, शरीझ अहमद 5-43, मिकेरेन 2-66, ऍकरमन 2-51, क्लेन 1-38), आयर्लंड 50 षटकात सर्वबाद 270 (विक्रमजित सिंग 14, मॅक्स ओ दाऊद 81, कूपर 74, ऍकरमन 28, एडवर्ड्स 36, शरीझ अहमद 8, क्लेन 8, क्लेसन नाबाद 10, अवांतर 7, वेस्ले मध्वेरे 3-36, सिकंदर रझा 3-39, मुझारबनी 1-39).