ऑनलाईन टीम / मुंबई :
संगीत क्षेत्रातील लोकप्रिय कंपनी टी-सिरीज या कंपनीचे अंधेरीतील ऑफिस सील करण्यात आले आहे. या कंपनीत काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आल्यावर ही इमारत सील करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना टी-सिरीज कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आमच्या कार्यालयात काम करणारा आणि तिथेच राहणारा एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहे, असे समजले आहे. त्यामुळे संपूर्ण इमारत सील करण्यात आली आहे. लॉक डाऊन सुरू झाल्यावर गावी न जाता आल्याने हा कर्मचारी ऑफिसच्या इमारतीमध्येच त्याची राहण्याची सोय कंपनीकडून करण्यात आली होती. त्याच्याबरोबर अजून दोन सुरक्षा रक्षक या इमारतीमध्ये राहत होते.
दरम्यान, त्याच्या सोबत राहणाऱ्या अन्य दोन जणांची देखील कोरोना टेस्ट घेण्यात आली आहे. अद्याप त्यांचे रिपोर्ट आलेले नाहीत.
पुढे ते म्हणाले, लॉक डाऊन सुरू झाल्यापासून आम्ही देखील सुरक्षेच्या दृष्टीने 15 मार्च पासून बंद ठेवले होते. जे काम केले जात आहे ते काम सर्व कर्मचारी घरूनच करत आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितले.