प्रतिनिधी / कुर्डुवाडी
शहरातील दुकाने सोमवार दि. ११ मे पासून काही अटी व शर्तींसह उघडण्यासाठी नगरपालिकेने परवानगी दिली आहे. यामध्ये बाजारपेठेची पूर्व व पश्चिम अशी विभागणी करून एक दिवसाड ही दुकाने उघडली जाणार आहेत. तसेच शहरातील प्रत्येक घराला एक पास देवून नेमून दिलेल्या दिवशी एकाच व्यक्तीला खरेदीसाठी बाहेर पडता येणार आहे.
याबाबत नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात शहरातील उघडण्यात येणार्या दुकानांची नावे व दिवस यांची यादी दिलेली असून प्रत्येक दुकानदारांना नमूद केलेल्या ११ अटींचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश या पत्रकात दिले आहेत. पालन न करणार्या दुकानदारांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
तसेच कुटुंबातील एका व्यक्तीसाठी कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत वस्तू खरेदी कामी घराबाहेर जाण्यासाठी पासचे वाटप शहरात करण्यात येणार आहे. त्यासाठी पिवळा, निळा व भगवा असे तीन रंगाचे पास दिले जाणार आहेत. यामध्ये पिवळ्या रंगाच्या पास असणार्याने सोमवार व गुरूवारी, निळ्या रंगाच्या पास धारकाने मंगळवार व शुक्रवारी तर भगव्या पास धारकाने बुधवार व शनिवारी खरेदीसाठी बाहेर पडायचे असे नियम आहेत. हे पासेस कोरोना विषाणू चा संसर्ग संपेपर्यंत निरंतर राहणार आहेत. हे नियम मोडल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार याशिवाय रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद राहणार आहेत.