ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. तिने काल म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अमृता राव आणि तिचा पती आरजे अनमोल यां दोघांनी यासंदर्भातील माहिती चाहत्यांसोबत शेअर केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृता आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. अमृता रावने आपली प्रेग्नेंसीची बातमी सीक्रेट ठेवली होती. प्रेग्नेंसीच्या शेवटच्या महिन्यात ती बेबी बंपसोबत आउटिंग करताना दिसून आली होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावर अमृताने स्वतः चाहत्यांची माफी मागत गुड न्यूज शेअर केली होती.
अमृता म्हणाली होती की, मला खूप आनंद होत आहे की, मी ही गोड बातमी माझे मित्र आणि चाहत्यांसोबत शेअर करत आहे. त्याचसोबत मी तुम्हा सर्वांची माफी मागत आहे, कारण ही बातमी माझ्यामुळे फार उशिरा तुमच्यापर्यंत पोहोचली. परंतु, ही बातमी खरी असून मी लवकरच बाळाला जन्म देणार आहे.’
दरम्यान, अमृताने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर चाहत्यांकडून अमृता राववर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचसोबत सगळे अमृताच्या बाळाचे नाव जाणून घेण्यासाठी आणि त्याचा पहिला फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
अमृता रावने 2016 मध्ये आरजे अनमोलसोबत लग्न केले होते. अमृता राव इश्क विश्क, मैं हु ना, विवाह यासारख्या चित्रपटानंतर बाळासाहेब ठाकरे या बायोपिकमध्ये दिसली होती. यामध्ये तिने बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीना ठाकरे यांची भूमिका निभावली होती.