ऑनलाईन टीम / चंदीगढ :
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज काँग्रेसचा राजीनामा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवला आहे. तसेच त्यांनी ‘पंजाब लोक काँग्रेस’ या नव्या पक्षाचीही घोषणा केली.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट केले की, मी काँग्रेसचा राजीनामा पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविला आहे. मी माझ्या नव्या पक्षाची घोषणा करत आहे. ‘पंजाब लोक काँग्रेस’ हे नव्या पक्षाचे नाव असेल. मात्र, त्याला निवडणूक आयोगाची मान्यता अद्याप मिळालेली नाही. पक्षाचे निवडणूक चिन्ह नंतर उपलब्ध होईल.
सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण काँग्रेसचाही राजीनामा देणार असल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. त्यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमधील राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या. पक्षामध्ये माझा अपमान होत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.