वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दूध आणि दुग्धोत्पादनात अग्रेसर असणाऱया अमुल समुहाने आता खाद्यतेल व्यवसायात शिरण्याचे निश्चित केले आहे. नुकतीच आपली ‘जन्मे’ ब्रँड नावाखाली विविध प्रकारची खाद्यतेले बाजारात आणली आहेत. सध्या ही खाद्यतेले गुजरात आणि राजस्थानमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने इतर राज्यांमध्ये ही खाद्यतेले विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. अमूलने कापूसबिया, शेंगदाणा, मोहरी, सोयाबीन अशी विविध प्रकारची खाद्यतेले 1 लिटर, 5 लिटर, 15 किलो पॅक स्वरूपामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. खाद्यतेल उत्पादनाच्या प्रक्रियेला गुजरातमध्ये प्रारंभ करण्यात आला असून तेथीलच शेतकऱयांनी पिकवलेल्या पिकांचे खाद्यतेल तयार करण्यात येत असल्याचे अमुलने म्हटले आहे. आपला देश आयातीत तेलावर 65 टक्के इतका अवलंबून असतो. रिफाइंड तेलाच्या आयातीवरच जास्तीत जास्त भर असतो हे पाहून कंपनीने शेंगातेल, मोहरी तेल स्थानिक स्तरावर तयार करण्याचा संकल्प केला आहे. बाजारात कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या कालावधीत सुरूवातीला इतर कंपन्यांच्या पॅकेट तेलाच्या मांगणीत चांगली वाढ दिसून आली होती. त्यावेळी मागणीच्या तुलनेने पुरवठा मात्र कमी होता. हीच बाब लक्षात घेऊन अमुलने खाद्यतेलाच्या व्यवसायात उतरण्याचे पाऊल उचलले आहे. खाद्यतेलासाठी गुजरातमधील शेतकऱयांना घेतलेल्या पिकांना योग्य तो भाव देण्याचेही आश्वासन अमुलने दिले आहे.