नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा इशारा : सत्ता हस्तांतरण सुलभपणे होणार
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झालेले ज्यो बिडेन यांनी युरोपीय देशांच्या नेत्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. अमेरिका आता खेळात (जागतिक सत्तास्पर्धा) परतली आहे, असे बायडेन यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेसमोर आव्हाने उभी करणाऱया चीन समवेत अन्य देशांसाठी बायडेन यांचा हा इशारा आहे.
बायडेन यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांना याची माहिती दिली आहे.
अमेरिका आता पुनरागमन करत आहे. आम्ही या खेळात परतलो आहोत आणि येथे केवळ अमेरिका नव्हे तर त्याचे सहकारी देखील असल्याचे बायडेन यांनी युरोपीय नेत्यांशी झालेल्या चर्चेची माहिती देताना म्हटले आहे. निकाल स्पष्ट झाल्यापासून बायडेन आणि नियोजित उपाध्यक्षा कमला हॅरिस स्वतःचे पथक आणि सल्लागारांसोबत सध्या डेलावेयर येथे आहेत. युरोपीय महासंघ आणि नाटोसंबंधी विचारांचे आदानप्रदान केले आहे. संबंध अत्यंत बळकट होत आहेत असे बायडेन यांनी मर्केल यांच्याशी झालेल्या चर्चेसंबंधी सांगितले आहे.
जॉन्सन यांच्याशी 20 मिनिटे चर्चा
डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यातील संबंध अत्यंत दृढ राहिले आहेत. काही डेमोक्रेट्स जॉन्सन यांना ट्रम्प यांचा क्लोन देखील संबोधितात. डेमोक्रेटिक पार्टीशी संबंधित असणाऱया बायडेन यांनी जॉन्सन यांच्याशी 20 मिनिटे चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान कोरोना महामारीसंबंधी चर्चा झाली आहे. तर बायडेन आता सौदी अरेबियाचे युवराज सलमान आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्याशीही चर्चा करणार आहेत.
हस्तांतरणाचा मुद्दा
निवडणुकीतील पराभव मान्य करण्याची तयारी ट्रम्प यांनी अद्याप दर्शविलेली नाही. परंतु ते स्वतः सार्वजनिक स्वरुपात जनतेसमोर आलेले नाहीत. ट्रम्प पराभवानंतर बायडेन यांना सत्ता सोपवतील का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. हे काम सहजपणे होईल याचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही सध्या यासंबंधी विचार करत नसल्याचे बायडेन म्हणाले.