बीपीएल मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित बेळगाव प्रिमियर लिग मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अर्जुनवीर साई सोशल संघाने विश्रुत स्ट्रायकर्सचा 26 धावांनी तर साई स्पोर्टस् हुबळी टायगर्सने मोहन मोरे संघाचा 6 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. वैभव कुरुबागी (अर्जुनवीर), डॉम्निक फर्नांडिस (साई स्पोर्टस्) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात अर्जुनवीर साई सोशल संघाने 20 षटकात 5 बाद 156 धावा जमविल्या. वैभव कुरुबागीने 4 चौकारासह 48, सुजय सातेरीने 1 षटकार, 4 चौकारासह 46, विजय पाटील 1 षटकार, 2 चौकारासह 23 तर अर्जुन पाटीलने 20 धावा केल्या. विश्रुततर्फे मुदस्सर नजीरने 18 धावांत 3 तर रब्बानी दफेदार, राहुल नाईक यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना विश्रुत टायगर्सचा डाव 18.4 षटकात सर्वबाद 130 धावात आटोपला. मिलिंद चव्हाणने 3 षटकार, 2 चौकारासह 38, वीरेश गौडरने 4 चौकारासह 17, मुदस्सर नजीरने 11 तर मनोज पाटीलने 10 धावा केल्या. अर्जुनवीरतर्फे वैभव कुरुबागीने 21 धावांत 4, शुभम गौंडाडकरने 21 धावांत 2, राहुल वाजंत्रीने 18 धावांत 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात मोहन मोरे संघाने 20 षटकात 9 बाद 127 धावा केल्या. रुद्रगौडा पाटीलने 1 षटकार, 4 चौकारासह 25, दर्शन मयेकरने 22 तर ध्रुव नाईकने 21 धावा केल्या. साई स्पोर्टस्तर्फे डॉम्निक फर्नांडिसने 21 धावांत 3, नंदकुमार मलतवाडकरने 22 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्सने 18.4 षटकात 6 बाद 133 धावा करून सामना सहा गडय़ांनी जिंकला. राहुल शिंदेने 3 षटकार, 2 चौकारासह 40, डॉम्निक फर्नांडिसने 2 षटकार, 2 चौकारासह 29 तर रविंद्र दरगन्नावरने 2 चौकारासह 21 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे अनंत कुंभारने 22 धावांत 2, संतोष सुळगे-पाटीलने 32 धावांत 2 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे राम सांगले, चंद्रकांत कडोलकर, चंद्रकांत बांडगी, अनिल माने यांच्या हस्ते सामनावीर वैभव कुरुबागी, इम्पॅक्ट खेळाडू शुभम गौंडाडकर, सर्वाधिक षटकार मिलिंद चव्हाण, उत्कृष्ट झेल मुदस्सर नजीर तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे परशराम पाटील, मिलिंद चव्हाण व सचिन साळुंखे यांच्या हस्ते सामनावीर डॉम्निक फर्नांडिस, इम्पॅक्ट खेळाडू नंदकुमार मलतवाडकर, सर्वाधिक षटकार राहुल शिंदे, उत्कृष्ट झेल किरण तारळेकर यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
शनिवारचे सामने
स्पोर्टस् ऑन विरुद्ध अर्जुनवीर साई सोशल, सकाळी 9 वाजता, 2) विश्रुत स्ट्रायकर्स विरुद्ध सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना, दुपारी 1 वाजता.