वार्ताहर/ एकंबे
द डेक्कन क्लिपहँगची नववी आवृत्ती असलेली देशातील प्रसिद्ध पुणे- गोवा अल्ट्रासायकलिंगमध्ये कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी झेंडा फडकवला आहे. तब्बल 643 किलोमीटरचे अंतर त्यांनी 32 तासांमध्ये पूर्ण केले आहे. महाबळेश्वरच्या उंच पर्वतरांगा, कोकणातील घनदाट जंगल आणि गोव्याचा समुद्रकिनारा असे या स्पर्धेचे महत्त्वपूर्ण भाग होते. गणेश किंद्रे यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून कोरेगावकर नागरिकांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला.
शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता पुण्यातील कर्वेनगरमध्ये असलेल्या केशव बागेतून या स्पर्धेस प्रारंभ झाला. रविवारी येथे गोवा येथे बोगमालो बीचवरील जोन्स सिगल येथे स्पर्धेचा समारोप झाला. 643 किलोमीटरचे अंतर हे दख्खनच्या पठारापासून कोकणात जाते, या स्पर्धेत विविध हवामान बदलांचे मोठे आव्हान असते. अमेरिकेतील रेस ऍक्रॉस अमेरिका स्पर्धेला सोलो क्वालिफायर होण्यासाठी ही इव्हेंट अत्यंत महत्त्वपूर्ण होती. देशभरातून जवळपास 350 सायकलस्वार या इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते.
कोरेगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर शिंग तुताऱयांच्या निनादात गणेश किंद्रे यांचे स्वागत करण्यात आले. रनर्स फाउंडेशन, कोरेगाव सायकल प्रेमी या विविध सामाजिक संस्था व पोलीस दलाच्यावतीने केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक जोतीराम बर्गे, विशाल कदम, सहाय्यक उपनिरीक्षक के. के. कुंभार, समाधान गाढवे यांच्यासह विविध मान्यवरांनी किंद्रे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.