लग्नप्रसंगी नवरीला छान आणि उठून दिसायचं असतं. यासाठी नवर्या मुलीचे कपडे आणि मेकअप विशेष लक्ष दिलं जातं. मात्र ब्रायडल लूक खुलवण्यासाठी कपडे आणि मेकअप सोबतच छानशी पर्सही असायला हवी. आता या पर्सची निवड कशी करायची हे समजून घेऊ.
- बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि स्टाईलच्या ब्रायडल बॅग्ज मिळतात. त्यांच्या किंमतीही खूप जास्त असतात. त्यामुळे सर्वात आधी तुमचं बजेट ठरवा. तुम्हाला किती किंमतीची पर्स घ्यायची आहे हे आधी ठरलं की खरेदी सोपी होऊन जाते. दुकानदार महागडय़ा पर्स दाखवतात. पण तुम्ही मात्र बजेटनुसारच पर्स खरेदी करा.
- आजच्या काळात नवरी वेगवेगळ्या रंगांचे आणि स्टाईलचे कपडे घालते. अनेक जणी स्वागत समारंभात इव्हिनिंग गाऊन किंवा लेहंगा चोली घालतात. त्यामुळे पर्सही तुमच्या पेहरावाला साजेशी असायला हवी. यासाठी आधी पेहरावाची खरेदी करून मगच पर्स घ्या.
- ब्रायडल पर्सचा आकार खूप महत्त्वाचा आहे हे नेहमी लक्षात ठेवा. फार मोठय़ा किंवा लहान आकाराची पर्स शोभून दिसणार नाही. जरूरीचं सामान मावणारी आकर्षक पर्स विकत घ्या. फार मोठय़ा आकाराच्या पर्स घेऊ नका.
- ब्रायडल पर्स म्हटली की भरपूर नक्षीकाम केलेली आणि हेवी हवी. मात्र लग्न आहे म्हणून फार भगभगीत पर्स घेऊ नका. तुमची पर्स आकर्षक असायला हवी. फार झगमगीत पर्स चांगली दिसणार नाही. तसंच ती नंतरही वापरता येणार नाही.
- सध्या ऑनलाईनचा जमाना असल्यामुळे तुम्ही थोडं संशोधन करा. पर्सचे ट्रेंड्स तसंच त्यांच्या किंमतींचा अंदाज बांधा. यानंतरच दुकानातून पर्स खरेदी करा. तुम्ही पर्सची खरेदी ऑनलाईनही करू शकता.