बाणावलीः आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेतील लढतीचा एक संग्रहीत फोटो.
क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
कोरोना व्हायरसच्या जबरदस्त फटका राज्यातील सर्व खेळांना बसला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे गोव्यात असलेल्या गावांतील फुटबॉल क्लबांना झाले आहे. आंतरग्राम फुटबॉल स्पर्धा हे गोव्याच्या फुटबॉलची लाईफ-लाईन आहे. राज्यातील जवळजवळ प्रत्येक फुटबॉल क्लब आंतरग्राम फुटबॉल स्पर्धा आयोजित करतो आणि हेच त्यांचे उत्पनांचे प्रमुख साधन आहे. मात्र आता लॉकडाऊनमध्ये एकतर क्लबांची सुरू असलेल्या स्पर्धा बंद झाल्या तर काही क्लबांना स्पर्धेचे आयोजन करण्यासही मिळालेले नाहीयं.
विविध क्लबांचे उत्पनांचे साधन म्हणजे आंतरग्राम फुटबॉल स्पर्धा. एखादा क्लब चालविणे म्हणजे सोपं काम नाही. विविध पुरस्कर्त्यांच्या पाठिंब्यांवर तसेच सामन्यावेळी हाऊझी किंवा सोडती काढून क्लब्स आपली आर्थिक स्थिती मजबूत करतात. फायदा झालेली रकम ते आपले वयोगटातील संघ तयार करण्यासाठी, जीएफएच्या फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी तसेच आपला युवा विकास कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी वापरतात. मात्र आता 18 मार्चपासून क्रीडा क्षेत्रातील सर्व व्यवहार थंडावल्याने फुटबॉल क्लबांची स्थिती आता गंभीर बनली आहे. कोविडमुळे यंदा कमाई नाही आणि येत्या मोसमासाठीही तयारीही नाही, असे दुहेरी संकट क्लबांसमोर आले आहे.
आम्ही आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करून झालेला फायदा आमच्या क्लबसाठी जीएफएच्या तिसऱया विभाग फुटबॉल स्पर्धेसाठी वापरतो. मात्र आता ते शक्य नाही. जीएफएची प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धा तसेच 18 वर्षाखालील आणि तासा गोवा फुटबॉल स्पर्धेचे आयोजन अजुनही सुरूच झालेले नाही. यामुळे हा फुटबॉल मोसम आता वाया गेल्यातच जमा आहे, असे कोलवाच्या सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लबचे सचिव जॉर्ज फर्नांडिस म्हणाले.
सध्या जीएफएची महिला फुटबॉल लीग तसेच 14 वर्षाखाली प्रथम विभाग फुटबॉल तसेच 16 व 18 वर्षाखालील सेकंड डिव्हीजन फुटबॉल स्पर्धांचे आयोजन पूर्ण झाले आहे. बहुतेक आंतरग्राम फुटबॉल क्लब्स जीएफएच्या तिसऱया विभाग फुटबॉल स्पर्धेत भाग घेतात आणि अन्य क्लब जीएफएच्या युवा फुटबॉल स्पर्धेत भाग घेतात.
आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनामुळे क्लबांना फायदा होतो. जीएफएच्याच नव्हे तर विविध क्लबांनी आयोजित केलेल्या स्पर्धेतही आम्हाला सहभाग घेता येतो. खेळाडूंना मानधन तसेच वाहतूकीचा खर्चही यातून सोडविता येतो. मात्र आता आम्हाला लॉकडाऊनचा जबरदस्त फटका बसल्याचे नावेली येथील मांडप स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष रॉबिन रॉड्रिग्स म्हणाले.
केपे तालुक्यातील तिळामळ यूथ क्लबचे सचिव मिलाग्रीस कार्वाल्हो यांनीही आपली प्रतिक्रिया देताना आपला क्लबही संकटात असल्याचे सांगितले. आमचा संघ 14, 16 व 18 वर्षाखालील जीएफएच्या स्पर्धेत भाग घेतो. मात्र आता फुटबॉल संघ चालविण्यासाठी काय करावं, हा यक्ष प्रश्न समोर आता उभा राहिला आहे. हे असचं चालूच राहिले तर येत्या मोसमात आम्हाला आमचे संघ स्पर्धेसाठी उतरविण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे कार्वाल्हो म्हणाले.
गोवा फुटबॉल संघटनेच्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी क्लब्स प्रत्येकी 20,000, प्रथम विभाग फुटबॉल क्लब 10,000, सेकंड डिव्हीजन क्लब्स 5000, तिसऱया विभागातील क्लब्स रोख 3000 तर वयोगटातील सहभागी क्लब्स रोख 2500 वार्षिक नोंदणी शुल्क जीएफएला देत आहेत.