आठ दिवसात करणार 1.70 लाख लसीकरण : 31 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही डोस पूर्ण करण्याचे ध्येय
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील 100 टक्के नागरिकांना येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत कोरोनाचा पहिला आणि दुसरा असे दोन्ही डोस देण्याचे ध्येय सरकारने बाळगले आहे. त्याचाच भाग म्हणून आज दि. 16 पासून राज्यात कोरोनाच्या तिसऱया टप्प्यातील लसीकरणाचा ‘टीका उत्सव 3.2’ सुरू होत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहकार्य द्यावे व गोवा हे देशातील पहिले राज्य बनविण्यास आधार द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
विरोधकांनी टीका करण्यापेक्षा ‘टीका उत्सवात’ सहभागी होऊन सरकारला सहकार्य करावे असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. पहिल्या डोसच्या 100 टक्के पूर्तीची माहिती जाहीर केल्यानंतर विरोधकांनी खास करून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, विजय सरदेसाई यांनी सरकारवर टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील सल्ला दिला.
गोव्यात 11.88 लाख लोकांना पहिला डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 90 दिवसांचा कालावधी उलटलेले राज्यातील सुमारे 1.70 लाख लोक ’टीका उत्सव 3.2’ च्या माध्यमातून पुढील आठ दिवसात दुसरा डोस घेणार आहेत. राज्यात 18 वर्षांवरील सुमारे 11.66 लाख नागरिक आहेत. आतापर्यंत गोव्यातील आणि गोव्याबाहेरील प्रवासी नागरिकांना मिळून एकूण 11.88 लाख नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. ही टक्केवारी सुमारे 102 टक्के एवढी आहे. दुसरा डोस घेणाऱयांची टक्केवारी 43.07 टक्के एवढी असून 5.02 लाख लोकांनी हा डोस घेतला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील 18 वर्षांवरील 100 टक्के नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. आता 31 ऑक्टोबरपर्यंत दुसरा डोस देऊन 100 टक्के लसीकरण पूर्ण करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य बनविण्याचे ध्येय सरकारने बाळगले आहे. ज्यांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला नाही त्यांनी तो कुठल्याही केंद्रात जाऊन घ्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यातील कोविड योद्धय़ांशी पंतप्रधान शनिवारी साधणार संवाद
कोरोना लसीकरणात गोवा सरकारने साध्य केलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले असून गोव्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्याही पुढे जाताना आता दि. 18 रोजी ते गोव्यातील कोविड योध्यांशी थेट संवाद साधणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.