घरगुती ग्राहकांना महावितरण देणार 40 टक्के अनुदान : घरगुती ग्राहकांना संधी
प्रतिनिधी/सांगली
नागरिकांना आता आपल्या घरावरच सौर उर्जा पॅनेल बसवून वीजनिर्मिती करता येणार आहे. त्याबदल्यात संबंधित ग्राहकांना वीजबिलात मोठी सवलत मिळणार असून उत्पादित वीज महावितरणच खरेदी करणार आहे. पॅनेल उभारणीच्या खर्चापोटी 40 टक्के अनुदानही मिळणार आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे.
या योजनेचा प्रसार-प्रचार करण्याच्या सूचनाही अधिकाऱयांना दिल्या आहेत. व्यक्तिगत मालकीची घरे, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना यांच्यासाठी ही योजना आहे. छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासन 40 टक्क्मयांपर्यंत अनुदान देणार आहे. यामुळे मासिक घरगुती वीजबिलात बचत होणार आहे. तर नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीजदेखील विकत घेतली जाणार आहे.
अशी आहे योजना
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रुफटॉप सौर योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी 25 मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या योजनेमधून घरगुती ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोवॅटपर्यंत 40 टक्के आणि 3 किलोवॅटपेक्षा अधिक ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सामुहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 टक्के अनुदान मिळणार आहे.
एक किलोवॅटसाठी 47 हजार किंमत
महावितरणने यासाठी परिमंडलनिहाय एजन्सी नियुक्ती केली आहे. त्याची यादी व ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या वेबसाईटवर आहे. पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी 1 किलोवॅटा 46,820, 1 ते 2 किलोवॅट- 42,470, 2 ते 3 किलोवॅट- 41,380, 3 ते 10 किलोवॅट- 40,290 तसेच 10 ते 100 किलोवॅटसाठी 37,020 रुपये प्रति किलोवॅट किंमत निश्चित केली आहे. या दराप्रमाणे 3 किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची 1 लाख 24 हजार 140 रुपये किंमत राहील. त्यामध्ये 40 टक्के अनुदानाप्रमाणे 49 हजार 656 रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल व संबंधित ग्राहकास प्रत्यक्षात 74 हजार 484 रुपयांचा खर्च करावा लागेल.
यंत्रणा कार्यान्वति केल्यानंतर दरमहा 100 युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा 550 रुपयांची बचत होऊ शकेल. तसेच नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही आर्थिक फायदा संबंधित घरगुती ग्राहकांना होणार आहे. सोबतच सौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः 3 ते 5 वर्षात परतफेड होणार आहे. दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनी रुफटॉप सौर ऊर्जा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
थोडक्यात अशी आहे योजना
महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांसाठी रुफटॉप
सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी 40 टक्के अनुदान
गृहनिर्माण संस्था, निवासी संघटनांना 20 टक्के अनुदान
वीजबिलात मोठी बचत, सुमारे 4 वर्षांत परतफेडीची संधी
नेटमिटरिंगद्वारे ग्राहकांची वीज महावितरण विकत घेणार