शारदोत्सव सोहळय़ाला प्रारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
आत्मभान सदैव जागे असणे हे खरे सौंदर्य होय. हे आत्मभान सजग, समाधानी राहण्याने आणि सकारात्मक विचारसरणीने येते. बेताल जगण्याला मर्यादांची चौकट असावीच लागते. आपल्या सुंदर दिसण्याने नव्हे तर कामात सातत्य ठेवणे, संवेदना जपणे आणि वेळेचा सदुपयोग करणे या गुणांनी सौंदर्य खुलते, असे विचार लेखिका प्राची प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
शारदोत्सव महिला सोसायटी आयोजित शारदोत्सव सोहळय़ाला गुरूवारपासून प्रारंभ झाला. लोकमान्य रंगमंदिरमध्ये सुरू असलेल्या या सोहळय़ाचे उद्घाटन प्राची जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर शारदोत्सवाच्या अध्यक्षा माधुरी शानभाग तसेच कार्यकारिणी सदस्या माधवी बापट, मेधा देशपांडे, संजीवनी खंडागळे, निर्मला कळ्ळीमनी, अरुणा नाईक, किर्ती दोड्डण्णावर आदी उपस्थित होत्या.
प्राची जावडेकर म्हणाल्या, उत्तम बांधा, नितळ त्वचा याने आपण छान दिसतो. परंतु आपण छान असण्यासाठी आपले मन सुंदर असायला हवे. सुंदरता म्हणजे मनाचा निर्धार होय. बऱयाचदा महिला न्युनगंड बाळगून वावरतात. आपल्याला काही जमले नाही असा एक निराशेचा सूर त्यांच्या बोलण्यात असतो. परंतु नकात्मक गोष्टी सौंदर्य कमी करतात. स्त्राr असणे हे वरदान आहे. मग दान मागायचे की वरदान वापरायचे हे आपणच ठरवायला हवे.
अरुंधती भट्टाचार्य, इंदिरा नुय्यी, शोभा डे यांचे दाखले देवून प्राधान्य क्रम ठरवता आला पाहिजे, प्रसंगी नकार देण्याची क्षमता बाळगली पाहिजे, स्वयंमशिस्त आणि वेळेचे व्यवस्थापन शिकले पाहिजे, प्रसंगी स्पष्ट बोलता आले पाहिजे, सर्व कामे स्वतावर ओढुन घेणे टाळले पाहिजे आणि समाज माध्यमांवरती निष्कारण घातला जाणारा वेळ अनेक उत्तमोत्तम गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी सत्कारणी लावला पाहिजे, असेही प्राची जावडेकर यांनी नमुद केले. आयुष्याची वाट चालताना शाश्वत काय आहे हे पाहून तत्वांपासून दूर जाऊ नका, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
प्रारंभी राष्ट्रसेवीका समितीने ईशस्तवन सादर केले. त्यानंतर दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक करताना माधुरी शानभाग यांनी कोरोना काळात इंटरनेचा वापर करुन महिलांनी आपल्या अस्मितेचे व स्वत्वाचे दीप लखलखते ठेवले, असे सांगितले. त्यानंतर शोभा लोकूर आणि सहकारी संपादित स्मरणीकेचे प्रकाशन डॉ. प्राची यांच्या हस्ते करण्यात आले. शोभा लोकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेधा देशपांडे यांनी प्राची यांना त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल काही प्रश्न विचारले.
यानंतर माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. तर शारदोत्सवाचा सुवर्ण प्रवास चित्रफितीच्या माध्यमातून प्रा. अरुणा नाईक, डॉ. संजीवनी खंडागळे व किर्ती दोड्डण्णावर यांनी उलगडला. सुत्रसंचालन निर्मला कळ्ळीमनी यांनी केले. तत्पूर्वी महिलांनी लेझीम खेळून पाहुण्यांचे स्वागत केले.