उरी चित्रपटाचा दिग्दर्शक अन् अभिनेत्री नव्या नात्यात
विक्की डोनर आणि बाला यासाख्या चित्रपटांमधील अभिनेत्री यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धर याच्यासोबत विवाह केला आहे. 32 वर्षीय यामी आणि 38 वर्षीय आदित्यने यासंबंधीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. कोरोनाकाळात त्यांनी छोटेखानी विवाह सोहळा केला असून यात कुटुंबातील काही मोजके लोकच सामील झाले आहेत.
कुटुंबाच्या आशीर्वादाने आम्ही विवाहबंधनात अडकलो आहोत. प्रेम आणि मैत्रीचा प्रवास सुरू करण्यासह आम्ही तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा इच्छितो असे यामीने सोशल मीडियावर म्हटले आहे.
हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर येथे 28 नोव्हेंबर 1988 रोजी जन्मलेल्या यामीने मॉडेल म्हणून कारकीर्दीस सुरुवात केली होती. तिने पहिली जाहिरात फेयर अँड लव्हलीसाठी केली होती. त्यानंतर चांद के पार चलो या टीव्ही सीरियलमधून पदार्पण केले. 2012 साली तिने विक्की डोनर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ऋतिक रोशनसोबत तिने काबिल चित्रपटातही काम पेले होते.
आदित्य धरने 2019 मध्ये ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी आदित्यला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘द इम्मोर्टल अश्वथामा’ हा त्याचा आगामी चित्रपट असून यात विक्की कौशल मुख्य भूमिकेत असणार आहे.