कोल्हापूरच्या आयटी सेक्टरची घोडदौड पाहण्याची संधी
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूरमध्ये दर्जेदार आयटी हब प्रोजेक्ट तयार करण्यात येणार असून यादृष्टिने आयोजित केलेले एक्स्पो- 2022 प्रदर्शन महत्वपूर्ण ठरेल. यातून आयटी क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये सुमारे 600 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाची तर 300 हून अधिक तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करुन जिह्यातील तरुण- तरुणी, सर्व महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी या आयटी एक्पो प्रदर्शनाला भेट द्यावी, कोल्हापूरकर आणि कोल्हापूरच्या बाहेरील व्यक्तींनीही कोल्हापूरच्या आयटी सेक्टरची घोडदौड पाहण्यासाठी आयटी एक्पो प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर जिह्यात दि. 18 एप्रिल ते 22 मे या कालावधीमध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचं आयोजन केलं आहे. या अंतर्गत दि. 16, 17 व 18 मे रोजी शाहू मिल येथे आयटी फेस्टचं आयोजन केले आहे. या आयटी एक्स्पो 2022 प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, कोल्हापूर आणि जवळपासच्या जिह्यातील आयटी क्षेत्रामध्ये काम करणाया विविध कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे. यामध्ये मोठय़ा संख्येने स्टार्टअपची नोंदणी होत आहे. जुन्या कंपन्यांनासुध्दा विदेशातील कामाच्या संधी मिळत आहेत. या सर्व कंपन्यांची तयारी व्यावसायिकांसमोर आणण्यासाठीच या एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे.
जिह्यातील सर्व मंत्री महोदय, खासदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने कोल्हापूरमध्ये तयार होणाया आयटी हब प्रोजेक्टसाठी सर्व कंपन्यांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी सांगितले.