प्रतिनिधी/ कोल्हापूर
महापूरग्रस्त काळात आशा कर्मचाऱयांनी सर्व्हे करण्याचे काम केले. या कामाचे त्यांना त्वरीत मानधन देण्याबाबत प्रयत्न करू अशी ग्वाही सीईओ अमन मित्तल यांनी आशा वर्कर्सच्या शिष्टमंडळास दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी अमन मित्तल यांच्यासोबत आशा व गटप्रवर्तक युनियनची आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी मित्तल यांनी त्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिली. यावेळी जिल्हास्तरावरील काम करताना येणाऱया अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मातृ वंदना योजनेचा लाभ लाभार्थी बरोबरच आशांना देऊ, सर्व ग्रामीण रुग्णालय मधील कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे लाभ आशांना वेळेवर मिळावेत यासाठी सिव्हिल सर्जन यांच्याशी चर्चा करु, शासनामार्फत आलेले सॅनेटरी नॅपकिन विकणे सक्तीचे करणार नाही,प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर आशा कक्षाची निर्मिती केली जाईल, ज्या अशांचे आधार लिंक प्रॉब्लेममुळे मानधन दिले नाही, त्यांना त्यांच्या अकाउंटला मानधन जमा करण्यात येईल, गटप्रवर्तक यांना लवकरच लॅपटॉप किंवा टॅब देणार, गटप्रवर्तक याना रेकॉर्डकीपिंगचे मानधन उपलब्ध व्हावे यासाठी पाठपुरावा करणार, आशा संजीवनी सेस फंड वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याची सीईओ मित्तल यांनी ग्वाही दिली. नेत्रदीपा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस उज्वला पाटील जनरल सेक्रेटरी, संगीता पाटील खजिनदार, उपाध्यक्ष मंदाकिनी कोडक, सुरेखा तिसंगी कर, उज्वला जडे, गीता चव्हाण, अनिता गुरव इत्यादी उपस्थित होत्या.