वृत्तसंस्था/ साऊदम्पटन
यजमान इंग्लंड आणि पाक यांच्यातील पावसाचा अडथळा आलेली दुसरी क्रिकेट कसोटी खेळाच्या शेवटच्या दिवशी अनिर्णित अवस्थेत संपली. तीन सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने पाकवर 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील शेवटची कसोटी याच ठिकाणी 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पाकच्या मोहम्मद रिझवानला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पावसाचा अडथळा आलेल्या या दुसऱया कसोटीत केवळ 134.3 षटकांचा खेळ झाला. सामन्यातील पाचव्या आणि शेवटच्या दिवशी 38 षटकांचा खेळ झाला. या सामन्यात पाकने पहिल्या डावात 91.2 षटकात सर्वबाद 236 धावा जमविल्या. पाकतर्फे मोहम्मद रिझवानने 72, अबिद अलीने 60, बाबर आझमने 47, अझहर अलीने 20 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे ब्रॉडने 4, ऍन्डरसनने 3, करन आणि वोक्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लंडने पहिल्या डावात 43.1 षटकात 4 बाद 110 धावा जमविल्या. क्रॉलेने 53. सिबलीने 32, बर्न्सने 0, पॉपने 9, रूटने नाबाद 9, तर बटलरने नाबाद 0 धावा जमविल्या. पाकतर्फे मोहम्मद आब्बासने 2, शाहीन आफ्रिदी आणि यासिर शहा यानी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक- पाक प डाव – 91.2 षटकात सर्वबाद 236, इंग्लंड प डाव 43.1 षटकात 4 बाद 110.