8.5 ऐवजी आता 9 टक्के जीडीपी दराचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2021-22 साठी याआधी वर्तवलेल्या अंदाजामध्ये रेटिंग एजन्सी इक्राने नुकतीच सुधारणा केली आहे. याआधी एजन्सीने संबंधीत वर्षाकरीता जीडीपी दर 8.5 टक्के वर्तवला होता. नव्याने 9 टक्के इतका सुधारीत जीडीपी दर इक्राने जाहीर केला आहे.
कोरोनाचा असर कमी होत असून देशात वेगाने लसीकरण होत असल्याचे कारण व पीकांमध्ये वाढीचा अंदाज तसेच सरकारी खर्चात आलेली तेजी पाहून इक्राने आपल्या अंदाजात नुकतीच सुधारणा केली. 2020-21 आर्थिक वर्षातील 7.3 टक्के आकुंचनानंतर 2021-22 मध्ये जीडीपी दरात वृद्धी अपेक्षीत असल्याचे इक्राने म्हटले आहे. दुसऱया कोरोना लाटेने ग्रामीण भागात प्रभाव अधिक दिसला होता. दुसरीकडे भारतीय रिझर्व्ह बँकेनेही आर्थिक वृद्धीदर 9.5 टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे. दुसऱया सहामाहीत स्थितीत मोठी सुधारणा अपेक्षीत आहे. याने अर्थव्यवस्था अधिक गतीमान होताना दिसेल. उत्तम पिके, विक्रीतील वाढ या गोष्टी अर्थव्यवस्थेला चालना देणाऱया ठरतील असेही इक्राने म्हटले आहे.