कैरो
इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. इजिप्तच्या शासकीय वाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. मुबारक यांनी सुमारे 3 दशकांपर्यंत देशातील सर्वोच्चपद भूषविले होते. पण 18 दिवसांपर्यंत चाललेल्या निदर्शनांमुळे 11 फेब्रुवारी 2011 रोजी त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
अरब क्रांतीनंतर मुबारक यांना अनेक वर्षे तुरुंगात रहावे लागले होते. पण 2017 मध्ये बहुतांश आरोपांतून मुक्तता झाल्याने मुबारक यांना तुरुंगातून बाहेर पडणे शक्य झाले हेते. मुबारक यांनी अरब जगतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाचे नेतृत्व केले होते.
1981 मध्ये अन्वर सादात यांच्या हत्येनंतर उपाध्यक्षपदी असूनही फारसे परिचित नसलेल्या मुबारक यांना देशाची धुरा देण्यात आली होती. त्यांच्या 30 वर्षांच्या शासनकाळात आणीबाणीसदृश स्थिती राहिली होती. होस्नी यांच्या विरोधात मुस्लीम ब्रदरहुडने मोर्चा उघडला होता.