फ्लोरिडामध्ये वादळाचे विक्राळ रुप
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
इयान चक्रीवादळामुळे अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये प्रचंड हानी झाली आहे. इयान वादळामुळे फ्लोरिडात वीजसंकट निर्माण झाले आहे. 240 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने हे वादळ फ्लोरिडाच्या किनाऱयावर धडकल्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. प्रांतातील अनेक क्षेत्रांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. इयान वादळामुळे फ्लोरिडात आतापर्यंत 25 लाखांहून अधिक जण बेघर झाले आहेत. बचावपथके घरे आणि इमारतीत अडकून पडलेल्या लोकांना वाचविण्याचे काम करत आहे.
इयान वादळ शुक्रवारी दक्षिण कॅरोलिनामध्ये पोहोचण्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे. इयान वादळाला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धोकादायक वादळांपैकी एक मानले जात आहे. फ्लोरिडातील बचावकार्यात अमेरिकेचे तटरक्षक दल, नॅशनल गार्डला सामील करण्यात आले आहे.