भारताशी संबंध दृढ करण्याचा नव्या पंतप्रधानांचा मानस
जेरूसलेम / वृत्तसंस्था
इस्रायलमध्ये नाफ्ताली बेनेट यांचे सरकार स्थानापन्न झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक 12 वर्षे पंतप्रधानपदी राहिलेले बेंजामिन नेतान्याहू यांना आता पदच्युत व्हावे लागले आहे. सोमवारी इस्रायलची संसद नेसेटमध्ये झालेल्या मतदानात बेनेट यांच्या युतीचा 60 विरुद्ध 59 असा अवघ्या एका मताने विजय झाला. एक सदस्य अनुपस्थित राहिला. इस्रायलच्या संसदेत 120 सदस्य आहेत.
नूतन पंतप्रधान बेनेट यांचे पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केले. बेनेट यांनी सत्रासूत्रे हाती घेतल्यानंतर भारताशी संबंध अधिक दृढ करण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. बेनेट हे अतिउजव्या ज्यूधर्मवादी आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते असून ते अब्जपती उद्योजकही आहेत. त्यांनी मध्यममार्गी आणि वामपंथीय पक्षांशी युती करून सरकार स्थापन केले आहे. बेनेट हे एकेकाळचे नेतान्याहू यांचे सहकारीच आहेत. ते नेत्यान्याहू मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री होते.
इस्रायलमध्ये मतांच्या प्रमाणात संसदेत जागा मिळत असल्याने गेल्या कित्येक दशकात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये सलग चार निवडणुका झाल्या. मात्र युती न झाल्याने सरकार स्थापन होऊ शकले नाही. याहीवेळी सरकार स्थापनेत अपयश आले असते तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती. तथापि, परस्परविरोधी विचारसरणी असलेले पक्ष एकत्र आल्याने सरकारची स्थापना शक्य झाली. आपले सरकार सर्व समाजघटकांसाठी असेल अशी घोषणा बेनेट यांनी सत्तास्थापनेनंतर केलेल्या भाषणात केली आहे. तसेच इराणला अण्वस्त्रे निर्माण करू देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नूतन पंतप्रधान बेनेट यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले. या संदेशाला त्वरित बेनेट यांनी आभाराचे प्रत्युत्तरही पाठविले आहे. भारताशी संबंध अधिक बळकट करणे हा आपला प्राधान्यक्रम असेल असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या 20 वर्षांमध्ये भारत आणि इस्रायल एकमेकांच्या जवळ आले असून इस्रायल भारताचा तिसऱया क्रमांकाचा संरक्षण भागीदार देश आहे.
संमिश्र प्रतिक्रिया
हमास या इस्रायलविरोधी संघटनेने नव्या सरकारसंबंधी उदासिन प्रतिक्रिया दिली आहे. नवे सरकार आले तरी हमासचे इस्रायलसंबंधी मत बदलणार नाही, असे या संघटनेचे प्रवक्ते फौझी बारहूम यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले. युरोपातील काही देशांनी नव्या सरकारचे स्वागत केले असून अमेरिकेनेही शुभेच्छा दिल्या आहेत.