दक्षिण कोरिया विरोधात कारवाई : किम यांच्या बहिणीची धमकी
वृत्तसंस्था/ सोल
उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या सीमेवर सैन्य पाठविण्याची धमकी दिल्याच्या काही वेळातच केसोंगमध्ये मोठा स्फोट झाला आहे. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या सीमेला लागून असलेल्या संयुक्त औद्योगिक क्षेत्रात उभारण्यात आलेले संपर्क कार्यालय स्फोटाद्वारे नष्ट केल्याचे मानले जात आहे. या घटनेनंतर अण्वस्त्रसज्ज उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील तणाव टोकाला पोहोचला आहे.
दक्षिण कोरियाला लागून असलेल्या सीमेवरील सैन्यरहित भागात सैन्य पाठविण्यास तयार असल्याचा इशारा उत्तर कोरियाने दिला होता. सीमेवर विरोधी संदेश असलेले फुगे उडविण्यात आल्याने उत्तर कोरियाचे नेतृत्व नाराज झाल्याचे सांगण्यात येते. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांची बहिण किम यो जोंग हिने दक्षिण कोरियाच्या विरोधात सैन्य कारवाईची धमकी दिली आहे.
बिघडणारे संबंध आणि सीमेवर उत्तर कोरियाविरोधी फुगे रोखण्यास असमर्थ ठरल्यानने दक्षिण कोरियावर किम यो यांनी सडकून टीका केली आहे. दक्षिण कोरिया लवकरच सीमेवर निरर्थक ठरलेले संपर्क कार्यालय बंद होण्याचा साक्षीदार ठरणार आहे. दक्षिण कोरियाच्या विरोधात प्रत्युत्तरादाखल कोणती कारवाई करावी, याचा निर्णय सैन्य नेत्यांवर सोडत असल्याचे किम यो यांनी म्हटले आहे.
‘ऍक्शन प्लॅन’
दक्षिण कोरियाच्या सीमेवर सैन्य पाठविणे आणि सैन्य देखरेख वाढविण्यास सज्ज असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे. एका ऍक्शन प्लॅनचे अध्ययन सुरू असून सैनिकांना सैन्यप्रतिबंधित भागात पाठविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे किम यो यांच्याकडून सांगण्यात आले. 1950 च्या युद्धानंतर या भागाला सैन्यप्रतिबंधित घोषित करण्यात आले होते.
दक्षिण कोरिया सतर्क
युद्धाच्या धमकीसंबंधी अमेरिकेशी चर्चा केली जात असून उत्तर कोरियाच्या सैन्य हालचालींवर नजर ठेवून असल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. दक्षिण कोरिया आणि जपान हे अमेरिकेचे मित्रदेश आहेत. अमेरिकेचे सैन्य दोन्ही देशांमध्ये तैनात आहे.
संपर्क कार्यालय
उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यादरम्यान निर्माण करण्यात आलेले संपर्क कार्यालय कोरोना संकटामुळे जानेवारीपासून बंद होते. 2018 मध्ये किम जोंग उन व द. कोरियाचे अध्यक्ष मून जेई इन यांच्यातील तीन शिखर बैठकांनंतर हे संपर्क कार्यालय निर्माण करण्यात आले हेते.