लखनौ / वृत्तसंस्था
समाजवादी पक्षाचे बंडखोर उमेदवार नितीन अग्रवाल हे भाजपच्या समर्थनाने उत्तर प्रदेश विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवडून आल्याने समाजवादी पक्षाला धक्का बसला आहे. सोमवारी ही निवडणूक झाली. सपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अग्रवाल यांनी बंडखोरी केली. त्यांना भाजपकडून समर्थन मिळाले. या निवडणुकीवर काँगेस आणि बसपने बहिष्कार घातला होता.
विधानसभेची संख्या 403 आहे. यापैकी 364 आमदारांनी मतदान केले. अग्रवाल यांना 304 मते मिळून ते निवडून आले. त्यांना मिळालेली सर्व मते भाजपच्या आमदारांची होती. भाजपचे 312 पैकी 304 आमदार सभागृहात उपस्थित होते. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक येत्या मार्चमध्ये होत आहे. त्या अगोदर होणाऱया या निवडणुकीला महत्व औपचारिक असले तरी सपमध्ये झालेली बंडखोरी हाच प्रमुख चर्चेचा विषय असल्याचे दिसून आले.