राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची माहिती
कोल्हापूर / प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीदिनी रविवारी 23 जानेवारीला शहर शिवसेनेच्या वतीने वैद्यकीय उपक्रमांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या मुलांची मोफत टु डी इको टेस्ट आणि उपचार करण्याबरोबर कोरोना लसीकरण आणि रक्तदान शिबिर आयोजित केले असून विकासकामांचेही उद्घाटन करण्यात येणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
मुंबई येथील नामांकित रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाद्वारे सी.पी.आर. रुग्णालय येथे रविवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत नवजात हृदय रोग असणाऱ्या 0 ते 18 वयोगटातील मुलांचे मोफत 2 डी इको तपासणी व उपचार शिबिर होईल. यावेळी एम.आर.सी.सी. नारायणा हेल्थ केअर रुग्णालयाचे डॉ.सुप्रमित सेन व त्याचे वैद्यकीय पथक तपासणी करणार आहे. हृदय शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या मुलांवर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
शहरातील 9 ठिकाणी 15 ते 18 वयोगटातील मुला – मुलींचे मोफत कोरोना लसीकरण शिबिराचे रविवारी आयोजन केले आहे. काशिलिंग विश्वेश्वर मंदिर कसबा बावडा, उभा मारुती चौक पोलीस चौकी शिवाजी पेठ, खोलखंडोबा हॉल शनिवार पेठ, महाराणी ताराराणी विद्यालय मंगळवार पेठ, सदर बझार हौसिंग सोसायटी को.म.न.पा. हॉल, रमाबाई आंबेडकर शाळा उत्तरेश्वर पेठ, जगदाळे हॉल राजारामपुरी, शेलाजी वनाजी शाळा लक्ष्मीपुरी, आदर्श विद्यामंदिर बापट कॅम्प या ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वेळेत लसीकरण होईल.
72 लाखांचा निधी मंजूर केलेल्या पापाची तिकटी ते शहीद भगतसिंग चौक, जुना बुधवार पेठ या रस्त्याचे नूतनीकरण आणि सुशोभिकरणाच्या कामाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. रविवारीच सकाळी 11ë30 वाजता माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावतीने शिवसेना संपर्क कार्यालय, खरी कॉर्नर येथे शहरातील नागरिकांसाठी मोफत कोविड 19 लसीकरणाच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
शिवसेना विभाग यादवनगर यांच्या वतीने न्यू क्रांन्ती तरूण मंडळ, यादव नगर आणि शिवसेना विभाग मुक्तसैनिक वसाहत यांच्या वतीने त्र्यंबोली मंदिर, मुक्त सैनिक उद्यान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन पेले आहे. शिवसेना विभाग कसबा बावडा यांच्या वतीने शिवनेरी विभागीय कार्यालय कसबा बावडा येथे ई- श्रमिक कार्ड नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासह शिवसेना शाखा जयभवानी गल्ली, कसबा बावडा यांच्या वतीने रेशनकार्ड नूतनीकरण, दुरुस्ती मोहीम राबविण्यात येणार आहे.