ऑनलाइन टीम / उस्मानाबाद :
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे समीकरण जिल्हा परिषदेत आकारास येत असतानाच उस्मानाबादेत मात्र नाटय़मय घडामोडी घडल्या आहेत. सेना आमदार तानाजी सावंत यांच्या गटाने केलेल्या मदतीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.
अध्यक्षपदी राष्ट्रवादीतील भाजप समर्थक अस्मिता कांबळे यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची वर्णी लागली आहे. महाविकास आघाडीत सर्व आलबेल सुरू असतानाच सेना आमदार सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर एकाच गाडीतून जिल्हा परिषद आवारात दाखल झाले. आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे संकेत मिळाले.
भाजपा आमदार राणा पाटील गटाच्या कांबळे यांना 30 मते मिळाली, तर महाविकास आघाडीच्या शेरखाने यांना 23 मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी कांबळे यांना विजयी घोषित केले. यानंतर उपाध्यक्ष पदासाठी मतदान झाले. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनाही 30 मते मिळाली, तर काँग्रेसचे आष्टे यांना 23 मते मिळाली.