आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडीचे सुपुत्र एअर कमोडोर सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाईदलात उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रपतींचे विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींनी हे विशिष्ठ सेवा पदक जाहीर केले आहे.
आटपाडी येथील वृत्तपत्र विक्रेते प्रभाकर भंडारे यांचे सुपुत्र, पत्रकार प्रशांत भंडारे यांचे जेष्ठ बंधू एअर कमोडोर सुहास भंडारे यांनी आपल्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत हवाई दलात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुहास भंडारे यांना विशिष्ठ सेवा पदक जाहीर केले आहे.
हवाईदल प्रमुख आर के एस भदोरिया यांनी एअर कमोडर सुहास भंडारे यांना विशिष्ठ सेवा पदक जाहीर केल्याचे आणि हवाईदलासाठी ही गौरवाची बाब असल्याचे पत्र पाठवून सुहास भंडारे यांचे अभिनंदन केले आहे. लवकरच राष्ट्रपती यांच्या हस्ते भंडारे यांना हे विशिष्ठ सेवा पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.