उडुपी जिल्हय़ातील हेजमाडी येथे प्रयोग यशस्वी : निर्मितीसाठी 7 लाख रुपये खर्च
प्रतिनिधी / बेंगळूर
एअरोनॉटिकल इंजिनियरिंग विद्यार्थ्यांच्या टीमने ‘धुती’ या संस्थेच्या सहकार्याने नदीतून आकाशात झेपावणारे अनोखे सी-प्लेन विकसित केले आहे. बीच टुरिझमला पूरक म्हणून हे विमान तयार करण्यात आले आहे. शुक्रवारी उडुपी जिल्हय़ातील हेजमाडी येथे शांभवी नदीत सी-प्लेनची चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे.
एनसीसी एअरो मॉडेलिंग इन्स्ट्रक्टर असणारे हेजमाडी येथील पुष्पराज अमिन यांच्या 15 वर्षांच्या परिश्रमातून हलक्या वजनाचे सी-प्लेन आकारास आले आहे. एक आसनी क्षमता असणारे हे विमान नदी किंवा समुद्राच्या पाण्यावरून आकाशात झेप घेऊ शकते. आता ही टीम केंद्र, राज्य सरकार किंवा खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे सहकार्य मिळविण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या टीममध्ये एअरोनॉटिक्सचे प्रा. शेणॉय राव, विद्यार्थी उत्सव उमेश तसेच आश्विन राव, यु. वासुराज अमिन, अभिषेक एन. कोटय़ान, रेश्मा जे. बंगेरा यांचा समावेश आहे.
सध्या केवळ चालक बसू शकतो अशा आकाराचे हे विमान तयार करण्यात आले आहे. या टीमने भविष्यात सात आसन क्षमतेचे सी-प्लेन तयार करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे, अशी माहिती पुष्पराज अमिन यांनी दिली आहे. 190 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता या विमानामध्ये आहे. एअरक्रॉफ्ट ग्रेड ऍल्युनियम, नायलॉन फॅब्रिक क्लॉथ, 33 एचपी क्षमतेचे 200 सीसी सीवोनिनी इटालियन इंजिन, 53 इंच प्रोफेलर उपकरण व इतर साहित्यांचा वापर करून हे विमान तयार करण्यात आले आहे. त्यासाठी इंधन म्हणून पेट्रोलचा वापर केला जात आहे. अलिकडे 7 ते 10 फूट उंचीपर्यंत सी-प्लेन उड्डाण केले जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
सरकारकडून मदतीची अपेक्षा
विमान बनविण्यासाठी एकूण 7 लाख रुपये खर्च आला आहे. त्याकरिता मित्र, नातेवाईकांनी मदत केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने नडीकुदु येथे प्रयोगशाळेची व्यवस्था करावी. तज्ञांच्या पथकाने पाहणी करून आपल्या पाठिशी रहावे. सी-प्लेन निर्मितीसाठी आवश्यक साधनसामुग्री खरेदीसाठी साहाय्यधन द्यावे, अशी मागणी पुष्पराज अमिन यांनी केली आहे.