लोणावळा / वार्ताहर :
कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासकीय समितीने घेतला आहे. चैत्री यात्राकाळातील देवीचे सर्व धार्मिक विधी व पूजापाठ हे परंपरेनुसार केले जाणार आहेत. मुंबई, पुणे, ठाणे परिसरात कोरोना संसर्ग रुग्ण आढळले आहेत. या विषाणूंचा संसर्ग टाळण्याकरिता व भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून जाहीर यात्रा न भरविण्याचा निर्णय श्री एकविरा देवस्थान कार्ला येथील प्रशासकीय समितीने घेतला आहे.
एकविरा देवस्थान हे पुणे जिल्हय़ातील वेहेरगाव गावात असून, येथे चैत्री यात्रेकरिता संपूर्ण महाराष्ट्रासह कोकण, रायगड, ठाणे, मुंबई भागातून लाखो भाविक येत असतात, गर्दीमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याचा सर्वांधिक धोका असल्याने भाविकांनी गडावर गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान यात्रा काळात तसेच दैनंदिन काळात देवीचे सर्व धार्मिक विधी, पूजापाठ हे परंपरेनुसार केले जाणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याने प्रशासकीय समितीने स्पष्ट केले.
वडगाव मावळ येथे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष व वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश, सचिव व मावळचे तहसिलदार व सदस्य सह धर्मदाय आयुक्त यांनी भाविक व वेहेरगाव ग्रामस्त यांच्याशी बैठक घेत हा निर्णय जाहीर केला. त्यापूर्वी वेहेरगाव ग्रामपंचायतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा न भरविण्याचा ठराव पारित केला होता.