वार्ताहर / एकसंबा
येथे 23 रोजी मास्क न घातल्याच्या कारणावरुन सीआरपीएफ जवान व पोलीस कर्मचाऱयांमध्ये झालेल्या झटापटीतून सदर जवानावर सदलगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर या घटनेवरुन बराच गदारोळ उडाला होता. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱयांसह लक्ष घातले होते. दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चिकोडी दिवाणी अतिरिक्त न्यायालयाने दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून सदर जवानाची काही अटींवर जामिनावर सुटका केली.
याविषयी अधिक माहिती अशी की, 23 रोजी सकाळी एकसंबा येथे सुट्टीवर आलेला सीआरपीएफचा कोब्रा कमांडो सचिन सावंत हा आपल्या घरासमोर दुचाकीची स्वच्छता करत होता. दरम्यान गस्त घालण्यासाठी आलेल्या दोघा पोलिसांनी जवानास मास्क घालून घरी जाण्यास सांगितले. यावेळी जवान व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक होऊन याचे रुपांतर झटापटीत झाले. यानंतर पोलिसांनी त्यास सदलगा पोलीस स्थानकात घेऊन बेडय़ा ठोकून सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून हिंडलगा कारागृहात रवानगी केली होती.
जवात सचिन सावंत यास जामीन मिळावा यासाठी सीआरपीएफचे अधिकारी व नातेवाईक वकिलांना घेऊन प्रयत्न करत होते. दरम्यान 28 रोजी सकाळी 12.40 च्या सुमारास जवानाच्या वकिलांनी जामिनासंदर्भात माहिती देताना सांगितले की, चिकोडी दिवाणी अतिरिक्त न्यायालयाने साक्षीदारास धमकी देऊ नये, पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करणे, मीडियासमोर कोणतीही वाच्चता नको, अशा अटी घालून जवानास जामीन मंजूर केला. ऑनलाईनद्वारे उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला. यानंतर उच्च न्यायालयाच्या नोटीफिकेशनप्रमाणे ऑनलाईन अर्ज जिल्हा न्यायालयात घालण्यात आला. जिल्हा न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुनावणी करण्यास सांगितले. जिल्हा न्यायालयाच्या आदेशावर दिवाणी अतिरिक्त न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकूण जामीन मंजूर केला आहे, असे ऍड. बी. डी. पाटील यांनी सांगितले.