कोरेगावमध्ये दुर्दैवी घटना; एकाचा जळालेल्या अवस्थेत तर दुसऱयाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह
वार्ताहर/ एकंबे
कोरेगाव शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शेती उत्पन्न बाजार समिती अर्थात मार्केट यार्ड समोर असलेल्या अनन्या रेसिडेन्सी या इमारतीतील तिसऱया मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यातील एक जणांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत तर दुसऱयाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना साधारणतः रविवारी मध्यरात्री घडली असून कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून व पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश ताटे हा 30 वर्षीय युवक आपल्या कुटुंबासह अनन्या रेसिडेन्सी या इमारतीतील तिसऱया मजल्यावर फ्लॅट क्रमांक 17 मध्ये वास्तव्यास होता. आई, आत्या, लहान भाऊ व भावाच्या हॉटेलमधील कामगार सुभाषकुमार प्रसाद हे देखील या फ्लॅटमध्ये राहत होते. ताटे कुटुंबीय हे मुळचे भाडळे गावानजिक असलेल्या बोधेवाडी येथील रहिवासी आहे. बोधेवाडी गावच्या यात्रेनिमित्त सर्वजण तिथे गेले होते.
ऋषिकेश व सुभाषकुमार हे दोघे रविवारी रात्री कोरेगाव येथील फ्लॅटवर आले. रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटमधील तिसऱया मजल्यावर जोरदार धमाका झाला. खिडकीच्या काचा फुटण्याचा आवाज झाल्याने शेजारचे रहिवाशांनी पॅसेजमध्ये गर्दी केली. फ्लॅटमध्ये आग व धूर दिसू लागल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. रात्र गस्तीवर असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ घटनास्थळी गाव घेतली. फ्लॅटमध्ये संपूर्ण धूर होता. ऋषिकेश ताटे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला तर सुभाषकुमार याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला पोलिसांनी तत्काळ ताटे कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावून घेतले. पंचनामा केल्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी रोहन ताटे याने दिलेल्या तक्रारीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार तपास करत आहेत.
कोरेगावात उलट सुलट चर्चा
ताटे कुटुंबीय हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय असून ऋषिकेश हा शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिकाच्या खाजगी रुग्णालयातील मेडिकल स्टोअर सांभाळत होता तर त्याचा भाऊ रोहन हा वाठारस्टेशन येथे एक हॉटेल चालवत आहे. या हॉटेलमध्ये सुभाषकुमार प्रसाद हा उत्तरप्रदेशमधील कानपूर जिह्यातील मूळ रहिवासी असलेला कामगार असून गेल्या सहा महिन्यापासून तो ताटे यांच्या समवेत राहतो. हॉटेलबरोबरच घरातील सर्व कामे करत असल्याने तो एक घरातील सदस्य या नात्याने वागत होता. बोधेवाडीच्या यात्रेसाठी तो देखील ऋषिकेश याच्या समवेत गेला होता. संपूर्ण कुटुंबीय बोधेवाडीत असताना हे दोघेच कोरेगावात परतले, कोरेगावात सुखरूप पोहोचण्याचा फोन देखील ऋषिकेशने आईला केला होता. त्यानंतर अवघ्या दोन तासात असे काही घडले की ऋषिकेश याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत तर सुभाषकुमार याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती सोमवारी सकाळी कोरेगाव शहरात वाऱयासारखी पसरली. सर्वत्र एकच चर्चा होती. मार्केटयार्ड समोर मोठय़ा प्रमाणावर गर्दी देखील झाली होती. एकूणच या प्रकाराबाबत कोरेगावासह भाडळे खोऱयात उलट सुलट चर्चा आहे.