सायबर सेंटरवरून फसवणूक : अन्न-नागरी पुरवठा खात्याचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून देण्यात येणाऱया नवीन रेशनकार्डचे काम बंद आहे. मात्र, काही सायबर केंद्रांवरून चुकीच्या पद्धतीने नवीन रेशनकार्डे उपलब्ध करून दिली जात आहेत. केवळ एवढेच नाही तर चक्क एपीएल रेशनकार्डला बीपीएल कार्डचा कलर देऊन फसवणूक केली जात आहे. प्रत्यक्षात रेशनकार्ड एपीएल आहे, मात्र बाहेरून त्याला बीपीएल कार्डचा कलर देऊन बीपीएल कार्ड असल्याचे भासविले जात आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेची फसवणूक होत असून संबंधित रेशकार्डधारकांनी अशा चुकीच्या पद्धतीने रेशनकार्ड काढू नये, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याने केले आहे.
तहसिलदार कार्यालयात शुक्रवारी अशाप्रकारे एपीएल कार्डला बीपीएल कार्डचा कलर केलेले रेशनकार्ड निदर्शनास आले आहे. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा खाते खडबडून जागे झाले असून अशा चुकीच्या पद्धतीने देण्यात येणाऱया रेशनकार्डना जनतेने बळी पडू नये, असे आवाहन खात्याने केले आहे. गतवषी कोरोनाचा प्रभाव वाढल्यापासून नवीन रेशनकार्डचे काम बंद आहे. मात्र, काही सायबर केंद्रांवरून चुकीच्या पद्धतीने नवीन रेशनकार्डे उपलब्ध करून दिली जात आहेत. अशी रेशनकार्डे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या निदर्शनास आली आहेत. काही सधन कुटुंबीयदेखील बीपीएल कार्डावर मिळणाऱया रेशनचा लाभ घेण्यासाठी अशा पद्धतीने रेशनकार्डे मिळवत आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांना याचा फटका बसत आहे. अशा चुकीच्या पद्धतीने रेशनकार्डे काढू नयेत व रेशनकार्डसंबंधी काही कामे असल्यास तहसिलदार कार्यालयातील अन्न व नागरी पुरवठा खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.